ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात ठिणगी ; शाखेच्या ध्वजारोहण कार्यक्रामास जाऊ नये म्हणून पोलिसांच्या शिवसैनिकांना नोटीसा

ठाणे येथील तलावपाली भागात असलेल्या शिवसेना जिल्हा शाखेत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने रात्री १२.०१ मिनीटांनी ध्वजारोहण केले जाते.

ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात ठिणगी ; शाखेच्या ध्वजारोहण कार्यक्रामास जाऊ नये म्हणून पोलिसांच्या शिवसैनिकांना नोटीसा
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (संग्रहित छायचित्र)

ठाणे येथील तलावपाली भागात असलेल्या शिवसेना जिल्हा शाखेत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने रात्री १२.०१ मिनीटांनी ध्वजारोहण केले जाते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास शिंदे आणि ठाकरे गट समोरासमोर येण्याची शक्यता असल्याने ठाणे पोलिसांनी शिवसेनेतील ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ध्वजारोहणास अटकाव करून नोटीसा बजावण्यास सुरूवात केली आहे. यास खासदार राजन विचारे आणि शिवसैनिकांनी तीव्र विरोध केला आहे. देशात अमृत महोत्सव साजरा होत असताना अटकाव करणे म्हणजे दडपशाही असल्याची टिका त्यांनी केली. कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नाही. ध्वजारोहण कार्यक्रमास शिवसैनिकांसोबत जाणारच असा इशाराही विचारे यांनी दिला आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी तलावपाली येथील जिल्हा शाखेत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने रात्री १२ वाजता ध्वजारोहणाची परंपरा सुरू केली होती. या सोहळ्यास ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक आवर्जून उपस्थित असायचे. दिघे यांच्या निधनानंतरही ही परंपरा कायम आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेला सुरूंग लागला आहे. शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळविल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवक आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. असे असले तरी ठाण्याचे खासदार राजन विचारे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे, अनिता बिर्जे, संजय तरे हे जुने शिवसैनिक अद्यापही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.

१५ ऑगस्टला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा मध्यवर्ती शाखेत उपस्थित राहणार आहे. हे दोन्ही गट एकमेकांसमोर येण्याची शक्यता असल्याने ठाणे पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यास सुरूवात केली आहे. यास खासदार राजन विचारे यांनी विरोध केला. खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, अनिता बिर्जे, संजय तरे यांच्यासह ठाकरे गटातील पदाधिकारी नौपाडा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर विचारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणत्याही दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही. देशात अमृत महोत्सव सुरू असताना आम्हाला रोखले जात आहे. मध्यवर्ती शाखेत ध्वजारोहण कार्यक्रमास शिवसैनिकांसोबत घेऊन जाणाराच. असे ते म्हणाले.

स्वातंत्र्य दिनाचे काही लोक राजकीय भांडवल करत आहेत. आम्ही कोणालाही ध्वजारोहणापासून रोखले नाही. – नरेश म्हस्के , माजी महापौर तथा ठाणे जिल्हाप्रमुख (शिंदे गट).

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police issue notice to shiv sena worker not to go to flag hoisting ceremony of talavpali district central branch amy

Next Story
डोंबिवलीतील सामाजिक संस्थांचा आदिवासी पाड्यांवर घरोघरी तिरंगा उपक्रम
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी