डोंबिवली – कल्याण डोंबिवली शहरांच्या विविध भागात राजकीय नेते, पदाधिकारी यांचे वाढदिवस गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांचे शुभेच्छा देणारे फलक कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परवानग्या न घेता लावण्यात आले आहेत. या फलकांमुळे शहरांचे विद्रूपीकरण झाले आहे. हे फलक काढण्यास राजकीय दबावामुळे पालिका अधिकारी हतबल असल्याचे चित्र आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने शहरांमध्ये बेकायदा फलक लावणाऱ्या राजकीय नेते पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे यापूर्वीच आदेश दिले आहेत. अशा प्रकारचे बेकायदा फलक आम्ही शहरांमध्ये लावणार नाहीत, अशी हमीपत्र राजकीय नेते प्रमुखांकडून उच्च न्यायालयाने घेतली आहेत. तरीही, स्थानिक राजकीय नेते, पदाधिकारी उच्च न्यायालयात दिलेल्या हमी पत्राचा विचार न करता डोंबिवली कल्याण शहरांमध्ये बेकायदा राजकीय फलक झळकवत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकही या राजकीय फलकबाजीमुळे तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

महापालिकेच्या डोंबिवलीतील फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दोन दिवसांपूर्वी राजकीय दबाव तंत्राला न जुमानता डोंबिवलीतील फ प्रभाग हद्दीतील राजकीय आणि इतर फलक काढून टाकले. त्याचप्रमाणे अ प्रभाग सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील आणि ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनीही अशाच प्रकारची आक्रमक कारवाई करून प्रभागातील राजकीय आणि इतर फलक काढून टाकले आहेत.

कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात बेकायदा राजकीय फलक झळकत आहेत. या फलकांवर कारवाई करण्याची जबाबदारी पालिकेच्या मालमत्ता विभागाचीही आहे. या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी या बेकायदा फलकांकडे पाहत कारवाई करत नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.कल्याण डोंबिवली शहरातील गणेशोत्सवाचे फलक गणेशोत्सव संपूनही अद्याप काढण्यात आले नाहीत. त्यात आता नवरात्रोत्सवाच्या फलकांची भर पडली आहे. फलक लावण्यासाठी शहरातील मोक्याच्या जागा अडून ठेवण्यासाठी जुने फलक काढण्यात येत नसल्याचे समजते.

शहरातील फलक काढण्यास पालिकेचे फेरीवाला हटाव पथक गेले की त्यांना तात्काळ राजकीय पदाधिकारी, नेते यांचा फोन येतो. आणि दमदाटीच्या स्वरात फलकांना का हात लावला जात आहे, अशी विचारणा केली जात आहे.कल्याण, डोंबिवली शहरांची मुख्य प्रवेशद्वारे, शहरांतर्गत मुख्य रस्ते राजकीय फलकांनी गजबजलेले असताना कठोर शिस्तीचे आयुक्त अभिनव गोयल याविषयी शामळू भूमिका घेऊन बसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.