कल्याण – महापारेषणच्या पडघा येथील उच्च दाब वीज वाहिकेतून पाल (मानपाडा, डोंबिवली) येथील महावितरणच्या उपकेंद्रात वीज पुरवठा केला जातो. हा वीज पुरवठा पाल उपकेंद्रातून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहरांना दैनंदिन पुरविला जातो. गेल्या दोन महिन्यापूर्वीप्रमाणे पुन्हा पडघा-पाल (मानपाडा) येथील उच्च दाब वीज वाहिकेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून पुन्हा या शहरांना विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागत आहे. या सततच्या तांत्रिक बिघाडामुळे महावितरणने विभागवार अघोषित वीज भारनियमन सुरू केले असल्याचे समजते.
शुक्रवारी रात्री साडे सात वाजताच्या दरम्यान पडघा-पाल येथील उच्च दाब वीज वाहिकेत बिघाड झाला. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागातील वीज पुरवठा अर्धा ते एक तास खंडित झाला होता. यापूर्वीच्या चार ते पाच दिवसात दिवसातून अनियमितपणे वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पाऊस सुरू आहे. धरणे भरली आहेत. अशा परिस्थितीत विद्युत निर्मितीसाठी पाण्याची टंचाई नसताना अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, त्याच बरोबर उद्योग, व्यावसायिक, खासगी आस्थापना, लघु उद्योग चालक त्रस्त झाले आहेत.
महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले, की पडघा येथील महापारेषणच्या उच्च दाब वीज वाहिकेतून पाल (मानपाडा, डोंबिवली) येथील महावितरणच्या वीज उपकेंद्राला दैनंदिन वीज पुरवठा केला जातो. हा वीज पुरवठा पाल उपकेंद्रातून अंबरनाथ, बदलापूर, कल्याण पूर्व, डोंबिवली शहर, २७ गाव परिसराला महावितरणकडून केला जातो. पडघा-पाल उच्च दाब वीज वाहिनीत बिघाड झाला की त्याचा परिणाम डोंबिवली, कल्याण, बदलापूर शहर परिसरातील वीज पुरवठ्यावर होतो. या शहरांचा वीज पुरवठा खंडित होतो. जून महिन्यात या उच्च दाब वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाला होता. महिनाभर हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम महापारेषणकडून सुरू होते.
पण, त्यात मुसळधार पाऊस आणि इतर तांत्रिक अडथळे येत होते. त्यामुळे जून महिन्यात अंबरनाथ, बदलापूर, कल्याण पूर्व, डोंबिवली, २७ गाव परिसरात सतत वीज पुरवठा खंडित होत होता. महावितरणला अघोषित वीज भारनियम करावे लागत होते. तसाच बिघाड आता महावितरणच्या पडघा पाल येथील उच्च दाब वीज वाहिनीवर सुरू झाला आहे, असे महावितरणच्या कल्याण, ड़ोंबिवलीतील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या बिघाडामुळे गेल्या पाच दिवसांपासनू अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, डोंंबिवली शहरांचा वीज पुरवठा खंडित होत आहे. हा तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्याचे काम गतीने सुरू आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांंगितले.