कल्याण – महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डाॅक्टरांना नोंदणीची परवानगी देण्याची अधिसूचना काढली आहे. या निर्णयाविरुध्द भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) ११ जुलै, शुक्रवारी राज्यव्यापी २४ तास आरोग्य सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये आयएमएच्या कल्याण शाखेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात कल्याणचे तहसीलदार यांना एक मंगळवारी निवेदन देण्यात आले आहे. या बंदनंतर मुंबईत एक भव्य फेरी काढण्यात येणार आहे, असे भारतीय वैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांंनी स्पष्ट केले आहे.

खासगी वैद्यकीय आरोग्य सेवा बंदबाबत मंगळवारी कल्याण आयएमएच्या अध्यक्षा डाॅ. सुरेखा ईटकर, डाॅ. राजेंद्र लावणकर, डाॅ. अश्विन कक्कर, डाॅ. विकास सुरंजे, डाॅ. स्नेहलता कुरीस, डाॅ. स्मिता महाजन, डाॅ. राजन माने, डाॅ. विद्या ठाकूर यांनी कल्याण तहसीलदार कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि शुक्रवारच्या बंदसंदर्भात एक निवेदन दिले.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने ३० जून २०२५ रोजी प्रसिध्द केलेल्या वाद्गग्रस्त अधिसूचनेचा आयएमए महाराष्ट्र शाखेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. एक वर्षाचा माॅर्डन फार्मसीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डाॅक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेत अराजक माजविणारा आणि नैतिकतेचा अवमान करणारा आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे, अशा शब्दात अध्यक्षा डाॅ. सुरेखा ईटकर यांंनी निवेदनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे.

ही वाद्गग्रस्त अधिसूचना रद्द करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ही अधिसूचना शासनाने रद्द केली नाहीतर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा आयएमएने दिला आहे.