बदलापूरः दररोज लोकल विलंबामुळे नोकदार वर्गाला फटका बसत असतानाच मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी खोपोलीहून येणारी मुंबई लोकल विलंबाने आल्याने एकच गोंधळ उडाला. या लोकलपूर्वी एका एक्सप्रेस गाडीला सोडण्यात आल्याने ही लोकल तब्बल ४० मिनिटे उशिराने आल्याचा आरोप प्रवाशांनी केली. त्यामुळे आधीच अरूंद असणाऱ्या बदलापूर स्थानकातील फटालांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे लोकल गर्दीने गच्च भरून जात होत्या. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून कर्जत स्थानकात सुरू असलेल्या रूळांच्या सुसुत्रिकरणाच्या कामामुळे कर्जतकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी मध्यरात्री १२च्या सुमारास रेल्वे प्रवाशांनी बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. कर्जतच्या दिशेला जाणाऱ्या लोकलच नसल्याने महिला प्रवाशांनी व्यवस्थापकांच्या कार्यालयात घेराव घातला होता. त्यानतंर बदलापूर स्थानकात आलेली बदलापूर लोकल पुढे नेण्यात आली. त्यानंतर सोमवारी पुन्हा लोकल विलंबाने आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
बदलापूर रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे पहाटेपासून सुटणाऱ्या लोकलगाड्या गर्दीने तुडूंब भरून जातात. त्यात एखादी लोकल उशिराने आल्यास त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसतो. उशिर टाळण्यासाठी प्रवासी येईल त्या लोकलमध्ये प्रवास करतात आणि गर्दी वाढते. मंगळवारी सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी सुटणारी लोकल उशिराने आली.
ही लोकल जवळपास ४० मिनिटे उशिराने आल्याची माहिती प्रवाशांनी दिली. त्यामुळे त्यामागून येणाऱ्या लोकलही उशिराने आल्या. परिणामी बदलापूर रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली. प्रवाशांनी स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयाबाहेर रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरूवात केली. सकाळच्या वेळी एक्सप्रेस गाड्यांना पुढे करून लोकल मागे ठेवल्याने हा गोँधळ उडाल्याचा आरोपही यावेळी प्रवाशांनी केला. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
तासभर बदलापुरहून लोकलही नाही
सकाळच्या सुमारास गर्दी अधिक असते. अशावेळी बदलापूर स्थानकातून ६ वाजून ५२ मिनिटांनी सुटणारी मुंबई लोकल गेल्यानंतर थेट ७ वाजून ५२ मिनिटांनी बदलापुरहून मुंबईला जाणारी लोकल आहे. या दरम्यान पाच लोकल या कर्जत आणि खोपोलीहून सोडल्या जातात. यातील एकही लोकल उशिराने आल्यास त्याचा फटका त्यामागून येणाऱ्या लोकल गाड्यांना बसतो. परिणामी प्रवाशांचे वेळापत्र बिघडते. या काळात बदलापूर स्थानकातून कोणतीही लोकल सुटत नसल्याने प्रवाशांना त्याच गाड्यांवर अवलंबून राहावे लागते. परिणामी स्थानकात गर्दी वाढते. मंगळवारीही अशीच स्थिती होती.
लोकल विलंबावर तोडगा काढा
सातत्याने विलंबाने येणाऱ्या लोकलमुळे यापूर्वीही प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. दहा ते १५ मिनिटे कोणत्याही कारणाशिवाय होणाऱ्या लोकल विलंबाची कोणतीही नोंद होत नाही. त्यामुळे नोकरदार वर्गाला कार्यालयात सबब सांगणे अवघड होते. त्यामुळे नोकरदार वर्गाला त्याचा आर्थिक फटकाही बसतो आहे. अनेकदा बदलापुरातून वेळेत सुटणारी लोकल उल्हासनगरनंतर रेंगाळत असल्यानेही मुंबईला पोहोचण्यास उशिर होतो. त्यावर तोडगा काढण्याची मागणी होते आहे.