ठाणे : ठाणे महापालिकेला गोल्डन गँगने अक्षरश: लुटून खाल्ले आहे. ठाणे महापालिकेचे प्रवेशद्वार येथील वाॅचमन नाही तर गोल्डन गँगचा म्होऱ्हक्या उघडतो आणि बंद पण तोच करतो. या लोकांनी संपूर्ण महापालिका लुटून खाल्ली आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी केला. तसेच त्यांनी शिंदे गटाचे खासदार म्हस्के यांच्यावरही टीका केली.

ठाणे शहरातील वाहतुक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पाणी प्रश्न तसेच ठाणे महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करत सोमवारी सायंकाळी ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने मोर्चा काढला होता. ठाण्यातील गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला होता. या मोर्चात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, मनसे नेते अभिजीत पानसे, अविनाश जाधव, काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांच्यासह ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा भागातील महाविकास आघाडी आणि मनसेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा महापालिका मुख्यालयाजवळ येताच, या सर्व नेत्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. त्यानंतर येथे एक जाहीर सभा देखील झाली. या सभेला संबोधित करताना राजन विचारे यांनी गोल्डन गँगचा उल्लेख केला.

वर्धापनादिवशीच अधिकाऱ्यावर कारवाई

  • ठाणे महापालिकेचा ४३ वा वर्धापनदिन सोहळा होता. या वर्धापनाच्या दिवशीच शंकर पाटोळे नावाच्या अधिकाऱ्याला मुंबई एसीबीने रेड हँड लाच घेताना पकडले. राज्यातील सर्वात जास्त कुठे भ्रष्टाचार होत असेल तर तो ठाणे जिल्ह्यात होत आहे असा आरोप विचारे यांनी केला. मागील तीन वर्षांत ठाणे महापालिकेत आयुक्त म्हणून कोणीच यायला तयार नाही. कारण महापालिकेतील अधिकारी हे कार्यकर्ते म्हणून काम करतात. पाटोळे यांना माज होता. पण नियतीचा डाव होता आणि त्यांना रंगेहात पकडले गेले असेही ते म्हणाले.

गोल्डन गँगने महापालिका लुटली.

  • दिवाळी आल्याने त्याच्या खर्चीसाठी महापालिकेत बिल्डरांची सुपारी घेऊन गोल्डन गँगचे कॅप्टन आले होते. ठाणे महापालिकेला गोल्डन गँगने अक्षरश: लुटून खाल्ले आहे. ठाणे महापालिकेचे प्रवेशद्वार येथील वाॅचमन नाही तर गोल्डन गँगचा म्होऱ्हक्या उघडतो आणि बंद पण तोच करतो. या लोकांनी संपूर्ण महापालिका लुटून खाल्ली आहे असेही राजन विचारे म्हणाले.