Premium

स्वत:शी प्रामाणिक राहून निवडलेला मार्ग हाच यशस्वी ‘करिअर’चा मूलमंत्र; राजेश नार्वेकर यांचे ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत प्रतिपादन

सध्याच्या स्पर्धात्मक युगात गोंधळवून टाकणारे अनेक करिअर पर्याय असताना नेमके जायचे कुठे, असा संभ्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये असतो.

Rajesh Narvekar career guidance
(‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या ठाण्यातील पर्वाचे उद्घाटन शुक्रवारी नवी मुंबई पालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी तासगावकर इन्स्टिटय़ूटचे रवी तिकटे, विद्यालंकारचे हितेश मोघे, एसबीआयचे जितेंद्र सामल, टिपटॉप प्लाझाचे जयदीप शहा उपस्थित होते.)

ठाणे : सध्याच्या स्पर्धात्मक युगात गोंधळवून टाकणारे अनेक करिअर पर्याय असताना नेमके जायचे कुठे, असा संभ्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये असतो. मित्र – मैत्रिणी एका विशिष्ट शाखेत प्रवेश घेत आहेत म्हणून किंवा पालक सांगत आहेत म्हणून अनेक विद्यार्थी त्यांचा कल नसलेल्या शाखेत प्रवेश करताना दिसून येतात. करिअरच्या दृष्टीने हे घातक ठरू शकते. यामुळे विद्यार्थ्यांनी ज्या क्षेत्रात आवड आहे, कल आहे असेच क्षेत्र करिअरसाठी निवडायला हवे. कारण, स्वत:शी प्रामाणिक राहून निवडलेला मार्ग हाच यशस्वी करिअरचा मार्ग असतो, असा सल्ला नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्याने लागू करण्यात आलेले शैक्षणिक धोरण, दहावी आणि बारावीनंतर नेमक्या कोणत्या शाखेत आणि क्षेत्रात प्रवेश घ्यावा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी आणि सर्व प्रश्नांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाने करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थी आणि पालकवर्गाने मोठा प्रतिसाद दर्शविला.

करिअरच्या दृष्टीने दहावी आणि बारावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असते. करिअरच्या या टप्प्यावर क्षेत्र अथवा शाखा निवडीवेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. याबाबत सर्वानी विचार करणे गरजेचे आहे. सध्याचा काळ हा स्पर्धात्मक काळ आहे. तसेच सध्या इंटरनेट, समाज माध्यमे यामुळे करिअरच्या असंख्य पर्यायांची माहिती विद्यार्थ्यांसमोर खुली होते. मात्र यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात संभ्रमही निर्माण होते. यामुळे विद्यार्थी गोंधळून जातात. अशावेळी नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण या पद्धतीच्या नियोजनाची सवय एकदा अंगवळणी पडली की त्याचा आयुष्यभर फायदा होतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन ..

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत शुक्रवारी उपस्थित विद्यार्थी वर्गाला आणि पालकांना विविध क्षेत्रातील करिअर संधी या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात संशोधन क्षेत्रातील करिअरच्या संधी याबाबत प्रा. डॉ. अरिवद नातू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट जीपीटी, समाज माध्यमांतील बारकावे आणि क्षेत्रातील करिअर संधी या विषयी विद्यार्थी आणि पालकवर्गाला संज्ञापन क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले केतन जोशी यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय तसेच उच्च शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
या पुढील सत्रात दैनंदीन धकाधकीच्या आयुष्यात आणि शैक्षणिक प्रवासात निकालानंतर तसेच स्पर्धात्मक जगात मानसिक आरोग्य कसे जपावे याची विविध प्रात्यक्षिके दाखवत ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी उपस्थितांशी मार्गदर्शनपर संवाद साधला. तर, नुकत्याच नव्याने लागू करण्यात आलेल्या शिक्षण धोरण आणि त्याबाबत सर्वत्र असलेला संभ्रम आणि विविध शंकांचे निरसन मुंबई विद्यापीठाचे माजी प्र – कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 04:39 IST
Next Story
डोंबिवलीतील आगीत मिलेनियम आर्केडमधील सदनिका जळून खाक