Thane Cluster : ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपड्या, चाळी आणि बेकायदा धोकादायक इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी समूह पुनर्विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येणार आहे. ठाण्यातील धोकादायक बेकायदा बांधकामांमध्ये जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या योजनेत सहभागी होण्यास अधिकृत इमारतीमधील रहिवाशांकडून विरोध होत असतानाच, आता ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कळव्यातील रहिवाशांनी क्लस्टर नको असे बॅनर इमारतीवर लावले आहेत.

ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती पावसाळय़ात कोसळून जीवितहानी होते. अशा घटना टाळण्यासाठी अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसेच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे ठाणे महापालिकेने तयार केले होते. त्याचे एकूण क्षेत्रफळ १५०० हेक्टर आहे. पहिल्या टप्प्यात किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत असून याठिकाणी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची आणि मालकी घरे मिळणार आहे.

रहिवाशांचा सातत्याने विरोध

क्लस्टर योजनेस मानपाडा भागातील झोपडपट्टी वासीयांनी यापूर्वी विरोध केला होता. घरावरील सर्व्हे क्रमांक पुसून टाकले होते. तसेच अधिकृत इमारतधारकांकडून योजनेस विरोध होत आहे. म्हाडातील रहिवाशांनी प्रकल्पास विरोध केला होता. ठाणे शहरातील भीमनगर, पवारनगर आणि विवेकानंदनगर या परिसरात म्हाडाच्या मालकीची जमीन मोठ्या प्रमाणात आहे. या जमिनीवर ‘म्हाडा’ने बैठ्या तसेच इमारतींच्या माध्यमातून वसाहती उभ्या केल्या आहेत. त्यात हजारो नागरिक वास्तव्य करीत आहेत. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या ४९ नागरी पुनरुत्थान आराखड्यांमध्ये या भागांचाही समावेश आहे. परंतु येथील जागा ‘म्हाडाह्णच्या मालकीची असल्यामुळे पालिकेला या ठिकाणी क्लस्टर योजना राबविणे शक्य होणार नाही. त्यामुळे पालिकेने येथील १९.९७ हेक्टर (४९.३५ एकर) इतकी जागा भाडेतत्त्वावर देण्याकरिता ‘म्हाडा’कडे ना हरकत पत्र मागितले. त्यास म्हाडा रहिवाशांनी आंदोलन करत विरोध केला होता.

क्लस्टर नको बॅनरबाजी

कळवा परिसरातील अधिकृत इमारतीमधील रहिवाशांनी क्लस्टर योजनेस विरोध सुरू केला असून या रहिवाशांनी ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर क्लस्टर नको असे बॅनर इमारतीवर लावले आहेत. नंदराज, अक्षय, मंगलदीप, न्यू राजदीप, राजस, न्यू पंचदीप, अवंती, निसर्ग, एकमत अशा सोसायट्यांचा समावेश आहे. क्लस्टर योजनेमुळे इमारतींचा पुनर्विकास लवकर होणार नाही आणि नागरिकांना लवकर हक्काचे घर मिळणार नाही. त्यामुळे क्लस्टर योजनेस विरोध असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यावर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केले असून त्यात जनतेनी ठरवले की ठरवले… क्लस्टर म्हणजे लूट कळवेकरांचे अभिनंदन, असे त्यांनी म्हटले आहे.