डोंबिवली : आपण वाहन जोरात चालविल्यामुळे वाहन खड्ड्यात आपटून आमच्या अंगावर खड्ड्यातील पाणी उडाले. त्यामुळे वाहन थोडे हळवू चालविण्याचा सल्ला दिल्याच्या रागातून दिवा गावातील एका वाहन चालकाने मुंबईत पवई येथे राहणाऱ्या वाहन चालकाला शिवीगाळ करत तोंडावर, हातावर चावीचा फटका मारला आणि प्रवाशाच्या हाताला चावा घेऊन त्याला जखमी केले आहे.

कल्याण शीळफाटा रस्त्यावर रविवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान रुणवाल गार्डन गृहसंकुलासमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. या घडलेल्या घटनेसंदर्भात मुंबईतील पवई येथील म्हाडा काॅलनीत राहणारे नोकरदार भारत सुरेंद्र कर्डक (३५) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दिवा येथील रहिवासी आणि वाहन चालक महेश दिलीप खरे (२६) यांच्या विरुध्द तक्रार केली आहे. खरे हे दिवा गावातील सद्गुरू नगरमधील ओमसाई चाळ भागात राहतात, असे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारदार भारत कर्डक यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की रविवारी रात्री दहा वाजता आपण दुचाकीवरून आपल्या बहिणीचा मुलगा प्रेम पाटील यांच्यासह कल्याण शिळफाटा रस्त्याने कल्याण दिशेकडे जात होतो. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. आपली दुचाकी शीळफाटा रस्त्यावरील रुणवाल गार्डन समोरील रस्त्यावर आली. त्यावेळी आपल्या दुचाकीच्या बाजुने वेगाने वाहनातून गुन्हा दाखल महेश खरे जात होते.

खरे यांचे वाहन वेगात असल्याने त्यांच्या वाहनाचे चाक रस्त्यावरील पाण्यात आपटून ते पाणी आपल्या आणि प्रेम पाटील यांच्या अंगावर उडाले. त्यामुळे कपडे खराब झाले. अंगावर रस्त्यावरील खराब पाणी उडाल्याने भारत कर्डक यांनी दुचाकी थांबवून वेगाने वाहन चालविणाऱ्या महेश खरे यांना वाहन हळू चालविण्याबाबत आणि अंगावर खराब पाणी उडल्याबाबत विचारणा केली. त्यावेळी तक्रारदार भारत कर्डक आणि महेश खरे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

महेश यांनी भारत यांना शिवीगाळ केली आणि आपल्या हातामधील चावीचा फटका भारत कर्डक यांच्या तोंडावर आणि हातावर मारला. यावेळी महेश आणि भारत यांची झटापटी झाली. या झटापटीत दिवा येथील महेश खरे यांनी रागाच्या भरात भारत कर्डक यांच्या हाताला जोराचा चावा घेतला. भारत यांच्या हाताला दुखापत झाली. इतर प्रवाशांनी हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केल्यानंंतर वाद मिटला. काहीही कारण नसताना महेश खरे यांनी आपणास शिवीगाळ, चावा घेतल्याने भारत कर्डक यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे तपास करत आहेत.