ठाणे : मंगळवार सकाळपासून ठाणे महापालिका क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. अशाच प्रकारे दिवा भागातील अनेक परिसर जलमय झाले असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावरूनच शिवसेना (उबाठा) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी पालिकेच्या कारभारावर टिका केली आहे.
ठाणे शहरात शनिवारपासून पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसभर पाऊस पडत होता. सोमवारी सकाळी पावसाची रिपरिप सुरु होती. सकाळी १० वाजेनंतर पावसाचा जोर वाढला. दुपारी ४ वाजेनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. ठाणे शहराच्या विविध भागासह दिवा, दातिवली, गणेशपाडा, डायघर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. शीळफाटा रोड, खर्डी दिवा रोड याठिकाणी पाणी साचले होते. यावरूनच शिवसेना (उबाठा) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी पालिकेच्या कारभारावर टिका केली आहे.
दिव्यात नालेसफाई झालेली नसल्यामुळे यंदा पुन्हा एकदा नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. चाळी-चाळीतील घरांमध्ये पाणी शिरले, रस्ते तुंबले, तर बेडेकर नगर, गणेश नगर, बी.आर. नगर, मुंब्रा देवी कॉलनी, डीजे कॉम्प्लेक्स, दिवा आगासन मुख्य रस्ता अशा अनेक भागात पाणी साचून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही ठाणे महापालिकेने डोळेझाक केली. दरवर्षी प्रमाणे कोट्यवधी रुपयांचा निधी नालेसफाईसाठी मंजूर होतो, कंत्राटदारांना मोबदला मिळतो, पण प्रत्यक्षात नाले मात्र साफ होत नाहीत. यावर्षी तर फक्त नावालाच पहिला फेरा झाला आणि त्यानंतर सफाई थांबली. महापालिकेचा संपूर्ण कारभार भ्रष्टाचाराने पोखरलेला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, अशी टिका मुंडे यांनीकेली आहे.
मुंडे यांनी कार्यकर्त्यांसमवेत प्रत्यक्ष नालेसफाई करून महापालिकेची पोलखोल केली. नागरिकांसमोरच श्लोक नगर दातिवली नाळा, रिलायन्स टॉवर येथील नाळा,टाटा पॉवर लाईन रोड येथील नाले दाखवत “महापालिकेचे दिंडवडे निघाले” अशी बोचरी टिप्पणी करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. दिव्यातील नागरिक त्रस्त आहेत, महापालिका मात्र निद्रिस्त आहे. भ्रष्टाचार आणि ढिलाईचा हा खेळ तातडीने थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरून मोठा आंदोलन उभारेल, असा इशारा मुंडे यांनी दिला आहे. ठाणे महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक आयुक्त आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.