किशोर कोकणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची दिवा रेल्वे स्थानकात शनिवारी मोठी गर्दी उसळली. आज, रविवारी ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवा येथून सावंतवाडी, रत्नागिरीला जाणाऱ्या रेल्वेगाडीत प्रवेश मिळावा, यासाठी प्रवासी एक दिवस आधीच स्थानकात येऊन ठाण मांडून बसत आहेत. तर, काही जण मिळेल त्या वाहनाने पनवेल रेल्वे स्थानकापर्यंतचा प्रवास करतात. तेथे कोकणातून दिवा स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या पॅसेंजरमध्ये बसतात आणि त्यानंतर त्याच पॅसेंजरने पुन्हा दिवा येथून कोकणाच्या दिशेने प्रवास करतात. रेल्वेत आसन मिळावे यासाठीच काही प्रवाशांकडून हा द्राविडी प्राणायाम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी प्रवासी तीन ते चार महिने आधीच रेल्वे गाडय़ांचे आरक्षण करतात. प्रवाशांच्या तुलनेत रेल्वेगाडय़ांच्या फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे अनेकांचे आरक्षण होत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी दिवा पॅसेंजर रेल्वेगाडय़ांनी कोकणचा प्रवास करतात. या गाडय़ांमध्येही मोठी गर्दी असते. प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा मिळत नाही. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी यंदा पॅसेंजरसह दोन विशेष मेमू रेल्वेगाडय़ांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यामुळे सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर, सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी दिवा-रत्नागिरी विशेष मेमू, सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी दिवा- रत्नागिरी पॅसेंजर आणि सायंकाळी ७.४५ मिनिटांनी दिवा-चिपळूण विशेष मेमू रेल्वेगाडय़ा सुरू झाल्या आहेत. या रेल्वेगाडय़ांमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी उसळत आहे.  प्रवाशांना डब्यात शिरण्यास जागा शिल्लक नसते. यामुळे सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी आणि ७ वाजून १० मिनिटांनी दिवा येथून सावंतवाडी आणि रत्नागिरीच्या दिशेने सुटणाऱ्या रेल्वेगाडीत बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी काही प्रवासी आदल्या दिवशी रात्रीपासूनच दिवा स्थानकात येतात.

वेळापत्रक कोलमडल्याने जाच

मुंबईतून कोकणात जाण्यासाठी पाच विशेष एक्स्प्रेस रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. स्थानक परिसरात नियोजित रेल्वे गाडी येण्याच्या दोन ते तीन तास आधीपासून प्रवासी स्थानकात गर्दी करत आहेत. शुक्रवारी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. त्यामुळे चार ते पाच तास उशिराने रेल्वेगाडय़ांची वाहतूक सुरू होती. त्याचा फटका प्रवाशांना बसला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rush of passengers at diva railway station deu to schedule collapses ysh