ठाणे : शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेत यावा यासाठी शहरातील नौपाडा परिसरातील सरस्वती विद्या मंदिर ट्रस्ट आणि येऊर येथील अनंताश्रम यांच्यावतीने “पेरणी ते कापणी” हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाची सांगता कापणी महोत्सवाने होणार आहे. बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते १० यावेळेत येऊर, पातलीपाडा येथील अनंताश्रमात हा महोत्सव साजरा होणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कौशल्य विकासावर आधारित शिक्षणपद्धती अंगीकारण्याच्या दृष्टीने शाळेने “पेरणी ते कापणी” हा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच जीवनाशी जोडलेले प्रत्यक्ष अनुभव देण्यावर शाळेचा उद्देश आहे. “शेती शिक्षण” हा शैक्षणिक उपक्रम म्हणून गेल्या दोन वर्षांपासून सरस्वती सेकंडरी शाळेमध्ये यशस्वीरीत्या राबविला जात आहे. या वर्षीच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यात अनंताश्रम येथील शेतात प्रत्यक्ष भात पेरणीचा अनुभव घेतला.
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी बियाण्यांची निवड, मातीची मशागत, रोपांची लावणी अशा सर्व टप्प्यांमध्ये सहभाग घेतला. यावेळी कृषी विषयातील मूलभूत ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले. पेरणीपासून लावणी आणि कापणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली आहे. शेतात हिरव्यागार भाताच्या रोपा आता डोलत आहेत आणि या मेहनतीचा आनंद विद्यार्थ्यांना कापणी महोत्सवात साजरा करता येणार आहे. कापणी महोत्सवात विद्यार्थी संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून आपला आनंद आणि निसर्गाविषयीचे प्रेम व्यक्त करणार आहेत. अनंताश्रम संस्थेच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडत आहे.
