कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेचे सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांना शनिवारी सकाळी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पालिकेत कार्यरत खासगी सुरक्षा एजन्सीच्या दोन सुरक्षा रक्षकांकडून एकूण एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. कल्याण पूर्वेतील सूचक नाका येथील चक्की नाक्यावर ही घटना घडली. मागील १२ वर्षात पालिकेत एकूण १२८ अधिकारी, कर्मचारी लाचखोरीत सापडले. काही जण कामावर पुन्हा कार्यरत होऊन निवृत्त झाले. बुळे हे लाच घेणारे अलीकडच्या काळातील ३९ वे लाचखोर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिका हद्दीतील अनेक विकास कामांच्या ठिकाणी नियोजन करण्यासाठी पालिका खासगी सुरक्षा एजन्सींकडून सुरक्षा रक्षक घेते. अशीच एक खासगी सुरक्षा एजन्सी पालिकेत कार्यरत आहे. या एजन्सीतील दोन सुरक्षा रक्षक पालिका हद्दीतील वायरलेस पाॅईंट येथे नियमित तैनात असतात. या ठिकाणावर कायमची नियुक्ती पाहिजे म्हणून तक्रारदार दोन सुरक्षा रक्षक प्रयत्नशील होते. अशाप्रकारे एकाच ठिकाणी कायमची नियुक्ती पाहिजे असेल तर पालिकेचे सुरक्षा अधिकारी भरत श्रावण बुळे (५०) यांनी दोन सुरक्षांकडे दरमहा प्रत्येकी ५०० रुपये लाच देण्याची मागणी केली.

हेही वाचा >>> ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा कानमंत्र; म्हणाले, “लोकांपर्यंत जाऊन…”

हा प्रकार खासगी सुरक्षा एजन्सीच्या सुरक्षा रक्षकांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांना सांगितला. वरिष्ठांच्या आदेशावरुन पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांनी याप्रकरणाची पडताळणी सुरू केली. पालिका सुरक्षा अधिकारी बुळे हे दोन खासगी सुरक्षा रक्षकांकडून प्रत्येकी दरमहा ५०० रुपयांची लाच मागत असल्याचे संभाषणावरुन स्पष्ट झाले. शनिवारी सकाळी कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात बुळे यांनी दोन्ही खासगी सुरक्षकांना एक हजार रुपये देण्यासाठी बोलविले. या भागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला होता.

हेही वाचा >>> VIDEO : ‘मंजिल एक दिन आयेगी…’ नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसात नरेश म्हस्केंची शायरी; म्हणाले “आमदारकीसाठी…”

सुरक्षा रक्षकांकडून एक हजार रुपये पालिका सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांनी स्वीकारताच पथकाने बुळे यांच्यावर झडप घातली. त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. ‘पालिकेने शार्प खासगी सुरक्षा एजन्सीला निविदा प्रक्रियेने दिलेल्या कामात गैरप्रकार झाला आहे. याप्रकरणाची चौकशीची मागणी आम्ही सुरक्षा विभाग प्रमुख पल्लवी भागवत, सुरक्षा अधिकारी बुळे यांच्याकडे केली होती. अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. आता ‘एसीबी’ने या अनुषंगाने चौकशी सुरू करावी,’ अशी मागणी माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security officer of kalyan dombivli municipality arrested while accepting bribe ysh