शहापूर : नाशिक – मुंबई महामार्गावर गोमांसाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीसांच्या अंगावरच वाहन नेऊन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. त्याचवेळी वाहनाचे चाक फुटल्याने पोलिसांचा जीव वाचला. या घटनेनंतर दोन्ही आरोपींनी घटना स्थळावरून पळ काढला. याप्रकरणी गोमांसाची वाहतूक करणाऱ्या दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी वाहन आणि गोमांस असा पाच लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महामार्गावरील चेरपोली हद्दीत रविवारी सकाळी हा प्रकार घडला असून फरार झालेल्या आरोपींचा शहापूर पोलीस शोध घेत आहेत. नाशिक – मुंबई महामार्गावर रविवारी आटगाव – चेरपोली दरम्यान नाकाबंदी सुरू होती. सकाळी ८ वाजताच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी कार संशयित रित्या आढळून आल्याने पोलीसांनी त्या कारला हात दाखवून कार थांबवण्याचा प्रयत्न केला.

मात्र कार चालकाने कार पोलीसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांचा जीव वाचला असून गोमांस वाहतूक करणाऱ्या कारचा टायर फुटला. त्यामुळे महामार्गावरच कार सोडून दोघांनी पोबारा केला. याप्रकरणी दोघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कार व गोमांस असा पाच लाख दहा हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.