ठाणे : गेल्या काही दिवसांपासून कळवा शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरीक हैराण झाले असून त्याचबरोबर अस्वच्छतेमुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पवार यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डम्पर रिकामा करत पालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदविला. यामुळे पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला होता.

गेल्या चार दिवसांपासून कळवा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही. त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढिग साचू लागले आहेत. त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करीत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगर पालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

अभिजीत यांनी कळव्यात जागोजागी साठलेला कचरा एका डम्परमधून भरून पालिका मुख्यालयाजवळ आणला आणि त्यानंतर पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच तो कचरा रिकामा केला. याशिवाय, कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. गेले काही दिवस कळवावासीय कचऱ्याच्या समस्येमुळे आणि दुर्गंधीमुळे हैराण असून पालिकेकडे वारंवार विनंती करूनही तो उचलला जात नव्हता. नागरिकांना काय समस्येला सामोरे जावे लागत होते, हे पालिकेतील अधिकाऱ्यांना समजावे म्हणून हे आंदोलन केल्याचे अभिजीत यांनी सांगितले.

मुख्य प्रवेशद्वारातील वाहतूक ठप्प

कचराभूमी नसल्याचे कारण पुढे करीत ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नाही. परिणामी कळव्याच्या विविध भागात कचरा साठू लागला आहे. अनेक सोसायट्यांच्या बाहेर कचरा जमा होत आहे. हा सराव कचरा अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली पुजा शिंदे- विचारे, कैलास हावळे, राजू शिंदे यांनी एका डंपरमध्ये आणून पालिका मुख्यालयासमोर टाकला. त्यामुळे पालिका परिसरात एकच खळबळ उडाली होती. पालिका आयुक्त, अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या वाहनांची वाहतूक होते, त्याच गेटसमोर हा कचरा टाकण्यात आला होता. त्यामुळे प्रवेशद्वारातून होणारी वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. सुरक्षारक्षकांनी गेट बंद केले आणि कुणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता.

तर आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू

जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिकेचा कारभार हा कचऱ्यात गेला आहे. आज फक्त पालिकेच्या दारात कचरा टाकला आहे. पण, जर एका दिवसात हा कचरा उचलला नाही तर पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याच्या दालनात, संबधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तसेच आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्यात येईल, असा इशारा अभिजीत पवार यांनी यावेळी दिला.