डोंबिवली ग्रामीण २७ गावांमधील शिवसेनेचा उध्दव ठाकरे यांना पाठिंबा ; ग्रामीण शिवसेना शाखेसमोर जल्लोष

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर गेल्या पाच दिवसांपासून गुपचिळी धरून बसलेल्या डोंबिवली, कल्याणमधील शिवसैनिकांनी उघड भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे.

dombivali shivsena
डोंबिवली ग्रामीण शिवसेना शाखेसमोर जल्लोष करताना शिवसैनिक( प्रतिनिधिक छायाचित्र )

डोंबिवली- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर गेल्या पाच दिवसांपासून गुपचिळी धरून बसलेल्या डोंबिवली, कल्याणमधील शिवसैनिकांनी उघड भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. कल्याणमधील शिवसेनेचे ज्येष्ठ काका हरदास, विजय साळवी यांनी शिंदे यांच्या बंडखोरीवर तीव्र नाराजी व्यक्त करून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याच पाठिशी राहण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. त्यानंतर डोंबिवली ग्रामीण २७ गावांमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठराव करून पक्षप्रमुख ठाकरे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेऊन ग्रामीण शिवसेना शाखेसमोर जल्लोष केला.

मोहने, टिटवाळा येथील शिवसैनिकांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची साथ सोडून उध्दव ठाकरे यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव भागात एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा दबदबा आहे. या भागातील एकही शिवसैनिक शिंदे पिता-पुत्रांच्या शब्दा बाहेर नाही. अशा परिस्थितीत बंडखोरीनंतर कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव भागातील शिवसैनिकांनी शिंदे पिता-पुत्रांची साथ सोडून उध्दव ठाकरे यांना समर्थन सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या भागातील शिवसेनेचे नगरसेवक, जुने निष्ठावान काही नगरेसवक मात्र अद्याप या विषयावर गप्प आहेत. त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

२७ गाव बैठक

डोंबिवली जवळील २७ गावांमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची शनिवारी रात्री सागाव शिवसेना शाखा येथे बैठक बोलविण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी हा चर्चेचा विषय होता. कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, तालुका उपप्रमुख बंडू पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, भगवान पाटील, मुकेश पाटील, सुखदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीला विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आतापर्यंत शिवसेनेने प्रवास केला. त्याच विचारांनी आपण वेळोवेळी राजकीय यश मिळविले. त्यामुळे मूळ विचारधारेला फाटा न देता शिवसेनेच्या मूळ प्रवाहात कायम राहून यापुढेही सक्रिय राहायचे, अशी मते बैठकीत व्यक्त करण्यात आली. शिंदे यांच्या बंडखोरीवर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्षप्रमुख उध्द‌ ठाकरे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार ठरावाव्दारे उपस्थित ३२ पदाधिकाऱ्यांनी केला. या निर्णयामुळे शिंदे यांच्या ग्रामीण बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे मनसेच्या डोंबिवली ग्रामीण गटात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, कल्याण पश्चिम मोहने येथील शिवसेना कार्यालया बाहेर शिवसैनिकांनी जमवून उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जल्लोष केला. टिटवाळा येथील कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे समर्थकांकडून कार्यकर्त्यांना शिंदे यांच्या पाठिशी राहण्यासाठी लघुसंदेश, मोबाईलवरून संपर्क साधला जात आहे. त्यांना प्रतिसाद दिला जात नाही, असे कल्याण ग्रामीण कार्यकर्त्यांनी सांगितले.

उपस्थित पदाधिकारी

दिलखुश माळी, केशव पाटील, सुनील भालकर, प्रल्हाद प्रजापती, रोश पाटील, धनाजी पाटील, संदीप कासार, उमेश सुर्वे, संदीप पाटील, विद्यासागर चौधरी, एकनाथ पाटील, मुकेश भोईर, प्रतीक पाटील, प्रकाश पाटील, कैलास पाटील, अशोक ठाकुर, रमेश पाटील, लालचंद पाटील, गणेश ठोंबरे, विजय भाने, जयेश माळी, शरद मुंडे, गणेश संसारे, धर्मराज शिंदे, नेताजी पाटील.

कल्याण ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय ठरावाव्दारे घेण्यात आला. त्यामुळे यापुढे कोणाच्या पाठिशी राहणार हा प्रश्न आमच्या दृष्टीने संपला आहे.- प्रकाश म्हात्रे
शिवसेना तालुका प्रमुख,डोंबिवली ग्रामीण

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena uddhav thackeray rural dombivali villages rural amy

Next Story
घोडबंदर : मानपाडा उड्डाणपूलावर ट्रकला आग; मोठी दुर्घटना टळली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी