डोंबिवली – कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भगव्या वातावरणात गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केला.

रणरणते उन, घामाच्या धारा, डोक्यात भगव्या टोप्या, हातात शिवसेना, भाजप, रिपब्लिकन, रासपचे झेंडे घेऊन महिला, पुरुष, युवा कार्यकर्ते उत्साहाने या उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीत सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

हेही वाचा – ठाण्यात नरेश म्हस्के यांच्याकडून मतांची जुळवाजुळव

भगव्या रंगाने सजविलेल्या टेम्पोत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंंदुराव, आनंद परांजपे, रवींद्र फाटक, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार प्रमोद पाटील, आमदार कुमार आयलानी, आमदार बालाजी किणीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी सकाळी श्री गणेश मंदिरात सकाळी सपत्निक गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंंतर गणेश मंदिर येथून फेरीला सुरुवात झाली. अंंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, २७ गाव, कळवा, मुंब्रा परिसरातून नागरिक, पक्षीय कार्यकर्ते या फेरीत सहभागी झाले होते. त्या प्रांताचे सांस्कृतिकपण मिरवणारी विविध प्रकारची पारंपरिक वाद्ये फेरीत सहभागी होती. वारकरी, युवा गट, विविध पेहरावातील महिला, पुरुष तरुण फेरीत घोषणा देत होते.

रस्त्याच्या दुतर्फा इमारतींमधील रहिवाशांना रथावरील नेते अभिवादन करत होते. काही ठिकाणी सोसायटीमधून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
खासदार श्रीकांत शिंदे यांची महती गाणाऱ्या गाण्यावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील, पत्नी लता शिंदे, नातू रूद्र आईसह फेरीत सहभागी झाले होते. रथावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी प्रत्येकाची धडपड होती. फडके रस्ता, मानपाडा रस्ता, चार रस्ता, टिळक रस्ता, घरडा सर्कलकडे जाणारी वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली होती. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले, रिक्षा वाहनतळ हटविण्यात आले होते. फेरीमुळे कोंडीत अडकून पडू या भितीने वाहन चालकांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे फिरकणे टाळले होते. यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या आणि शहराच्या इतर भागात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

हेही वाचा – म्हस्के, सरनाईकांसमोरच नाईक समर्थकांची घोषणाबाजी

कल्याण लोकसभा मतदारसंघातून सुमारे शंभरहून अधिक बस भरून कार्यकर्ते फेरीसाठी आणले होते. या बस शहरातील एमआयडीसी, ठाकर्ली बावनचाळ मैदान भागात उभ्या करण्यात आल्या होत्या. खासदार शिंदे यांनी मतदारसंघात ज्या भागात विकासाची कामे केली त्या भागातील सर्वाधिक नागरिक, कार्यकर्ते या फेरीत सहभागी झाले होते.

रोजंंदारीवर कार्यकर्ते

फेरीत सहभागी काही महिला, पुरुष कार्यकर्त्यांंशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी वडापाव, पाणी, टोप्या, उपरणी यांसह आम्हाला ७०० रुपयांची बिदागी मिळाली असे स्पष्टपणे सांगितले.

आजचा कार्यकर्त्यांचा जनसमुदाय पाहून आपण आता राज्यातही काम करू शकतो. ही शाश्वती कार्यकर्त्यांनी दिली आहे. आपल्या विकास कामांना नागरिक, कार्यकर्ते यांनी दिलेली पावती म्हणजे हा जनसमुदाय आहे. हा जनसमुदायच आपणास आपल्या कामाची पावती देईल. – डाॅ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा.