कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई, ठाणे जिल्हा आस्थापनेवरील आचार्य अत्रे रंगमंदिरातील १६ सुरक्षा रक्षकांना ऑगस्टपासून वेतन मिळत नसल्याने आठ तास काम करणाऱ्या या सुरक्षा रक्षकांमध्ये नाराजी आहे. कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालय, पालिकेची प्रभाग कार्यालये, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, आचार्य अत्रे नाट्यगृह, शिक्षण विभाग, पालिकेच्या स्मशानभूमी अशा पालिकेच्या विविध विभाग, आस्थापना असलेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई, ठाणे जिल्ह्याचे १०८ सुरक्षा रक्षक कल्याण डोंबिवली पालिकेत कार्यरत आहेत. या सुरक्षा रक्षकांची सेवा निमशासकीय सेवा म्हणून गणली जाते. त्यामुळे शासनाचे बहुतांशी नियम या सुरक्षा रक्षकांना लागू आहेत.
सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई, ठाणे जिल्हा विभागाचे १०८ सुरक्षा रक्षक पालिकेत कर्तव्यावर हजर झाले. तेव्हा त्यांचे दरमहाचे २१ हजार रूपयांचे वेतन पालिकेच्या बांधकाम विभागाकडून काढले जात होते. शहर अभियंता अनिता परदेशी या सुरक्षा रक्षकांचा नियमित पगार होईल यादृष्टीने काटेकोर होत्या. पालिकेच्या सुरक्षा विभागातील एका अतिहुशार ज्येष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांचे पगार पालिका सुरक्षा विभागाकडून काढावेत यासाठी हट्टाने प्रयत्न केले. बांधकाम विभागाकडून सुरक्षा रक्षकांचा पगार काढण्याचे काम सुरक्षा विभागाकडे घेतले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये अनियमितता येऊ लागली, असे सुरक्षा रक्षकांनी सांगितले.
सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक गटाने पालिकेच्या विविध विभाग, आस्थापनेवर कार्यरत आहेत. प्रत्येक विभागाने सुरक्षा रक्षकांचा महिन्याचा पगार वेळेवर होईल यादृष्टीने आवश्यक मंजुऱ्या घेतल्या. त्यांचे वेतन नियमित दिले जाते. पण अत्रे रंगमंदिरातील १६ सुरक्षा रक्षकांना वेतन देण्याचा अद्याप ठराव करण्यात आलेला नाही. त्यांना मग वेतन कसे देता येईल, असे प्रशासनातील काही वरिष्ठांनी उपस्थित केले आणि हा विषय प्रलंबित ठेवला.
आमचे रखडलेले आणि नियमितचे वेतन दरमहा मिळावे म्हणून पालिका प्रशासनात कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने वेतन न मिळालेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. गेल्या तीन महिन्याचे वेतन न मिळाल्याने आम्ही मुलांचे शालेय शुल्क, घरातील रुग्णांची औषधे, कौटुंबिक खर्च करू शकलो नाही. दिवाळीत इतर कर्मचारी वेतन, बोनस देऊन मौज करत होते. आम्हाला हक्काचे वेतनही मिळाले नाही, अशी खंत सुरक्षा रक्षक व्यक्त करत आहेत.
आचार्य रंग मंदिरातील १६ सुरक्षा रक्षकांचा ठराव मंजुरीसाठी वरिष्ठांककडे पाठविला आहे. आवश्यक मंजुऱ्या होऊन येत्या दहा दिवसात सुरक्षा रक्षकांचा वेतनाचा विषय मार्गी लागेल. भरत बुळे मुख्य सुरक्षा अधिकारी, कडोंमपा.
