कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती प्रकरणी सविस्तर अहवाल पाठविण्याचे आदेश दिेले आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही डोंबिवलीतील बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारण्यात आलेल्या बेकायदा इमारतीचे विकासक, जमीन मालक आणि वास्तुविशारद यांची चौकशी सुरू करणार आहोत, अशी माहिती मुंबईतील सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) एका वरिष्ठ सुत्राने दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींचे प्रकरण उघडकीस आल्यापासून ईडीकडे डोंबिवली, कल्याण मधील अनेक बेकायदा इमारतींच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा तक्रारींची छाननी करुन त्यांचीही चौकशी केली जाणार आहे, असे ‘ईडी’च्या वरिष्ठ सुत्राने सांगितले.
६५ बेकायदा इमारती उभारताना विकासकांनी पैसा कोठुन उभा केला. सदनिका विक्रीनंतर तो पैसा कुठे नंतर वापरला. हे सगळे व्यवहार तपासले जाणार आहेत. ६५ बेकायदा इमारती उभारणारे भूमाफिया प्राप्तिकर भरणा करत होते का. वस्तु व सेवा कर त्यांनी भरणा केला होता का. शासनाचे विविध करमूल्य त्यांनी भरणा केले होते का, अशा अनेक बाजुनी हा तपास केला जाणार आहे, असे सुत्राने सांगितले.

हेही वाचा: कल्याण: पूर्व भागातील रस्त्यावरील स्वागत कमानींचा होतोय वाहतुकीला अडथळा

कल्याण डोंबिवली पालिकेला बेकायदा इमारत प्रकरणांची माहिती कशा पध्दतीने पाठवायची यासाठी एक तक्ता तयार करुन दिला आहे. त्या तक्त्यामध्ये इंग्रजीमधून माहिती भरुन पाठविण्याचे आदेशित केले आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही ६५ बेकायदा इमारत प्रकरणात प्रत्यक्ष चौकशीला सुरूवात करणार आहोत, असे ईडीच्या वरिष्ठाने सांगितले.

६५ इमारतींचा ठिकाणा निश्चित

डोंबिवलीत बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारण्यात आलेल्या ६५ इमारतींची ठिकाणे पालिकेच्या नगररचना विभागातील भूमापकांनी (सर्व्हेअर) यांनी निश्चित केली आहेत. पालिकेच्या ग, फ आणि ह प्रभाग विभागातील कर्मचाऱ्यांवर ही कामे देण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी आम्हाला ठिकाणे सापडत नाहीत अशी भूमिका घेऊन या बेकायदा इमारतींची पाठराखण सुरू केली होती. अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी नगररचना विभागातील भूमापकांना ६५ इमारतींची ठिकाणे शोधून काढण्यास सांगितले होते. भूमापक संजय पोखरकर, बाळू बहिरम, प्रकाश थैल, पांडुरंग जगताप यांनी दोन दिवसात ६५ इमारतींची ठिकाणे शोधून काढली. प्रभागातील कर्मचारी काही इमारतींची नावे यादीत येऊ नयेत म्हणून प्रयत्नशील होते. भूमापकांनी त्यांची मागणी धुडकावून लावली.

हेही वाचा: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पंधराशे लाभार्थींना गोवर प्रतिबंधित लशीचे लसीकरण

अहवाल निश्चिती

६५ बेकायदा इमारती कोणत्या ठिकाणी बांधल्या आहेत. त्या जागेचा मालक, बांधकाम करणारा भूमाफिया आणि त्या बांधकामाचा वास्तुविशारद यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या बेकायदा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना भूमाफियांनी नोटरी कागदपत्र तयार करुन ३० ते ३५ लाख रुपयांना घरे विकली आहेत. ती कागदपत्र भूमापकांनी ताब्यात घेतली आहेत. वाद्ग्रस्त ७० टक्के इमारतींमध्ये रहिवास तर ३० टक्के इमारती रिकाम्या आहेत, असे भूमापकांना आढळून आले आहे. ईडीला पाठवायचा अहवाल इंग्रजीतून तक्त्यामध्ये पाठवायचा असल्याने त्याचे काम पालिकेत अंतीम टप्प्यात आले आहे.

तपास पथक थंडावले?

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने ६५ इमारत प्रकरणात फक्त १० भूमाफिया, मध्यस्थांना अटक करुन त्यानंतर एकाही माफियाला अटक न केल्याने तपास पथकाच्या कार्यपध्दती विषयी प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. बहुतांशी माफिया राजकीय मंडळींशी संबंधित असल्याने, राजकीय दबावामुळे पथकाच्या कामात अडथळे येत असल्याची चर्चा आहे. असा कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. आमचे काम सुरू आहे, असे पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा: कल्याण: फलक लावून शहर विद्रुप करणाऱ्यांवर महापालिका दाखल करणार फौजदारी गुन्हे

“ ६५ बेकायदा इमारती निश्चित करण्याचे काम सुरू आहे. ही निश्चिती झाल्यानंतर त्याची सविस्तर माहिती संकलित करुन अहवाल ईडीकडे पाठविला जाणार आहे.” -सुधाकर जगताप, उपायुक्त

” पालिकेचा अहवाल सक्तवसुली संचालनालयकडे पाठविण्यात आल्यानंतर आपण पुन्हा ईडीच्या वरिष्ठांची भेट घेणार आहोत आणि त्यांना सविस्तर माहिती देणार आहोत.” -संदीप पाटील, वास्तुविशारद व तक्रारदार

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sixty five illegal buildings scam ed officers waiting for municipal report in kdmc tmb 01