ठाणे : कल्याण-डोंबिवली वगळता ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात राज्य शासनाकडून सहा हजाराहून अधिक सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. या प्रकल्पास सुरुवातीला ४९२ कोटी रुपये इतका खर्च येणार होता. त्यामध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) नमूद नव्हता. त्यामुळे या प्रकल्पास अडथळा आला होता. आता राज्य शासनाने या प्रकल्पास जीएसटीसह मान्यता दिली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही प्रकल्पाचा मार्ग सुकर झाला आहे. तसेच ठाण्याचे पोलीस आयुक्त यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरे येतात. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांकडून गस्ती घातली जाते. परंतु एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीचा आधार घ्यावा लागतो. तसेच एखादा अपघात घडल्यास त्याची देखील माहिती सीसीटीव्हीद्वारे मिळत असते. ठाणे महापालिका क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते दिवा शहरात महापालिकेने बसविलेल्या सीसीटीव्ही अत्याधुनिक नाहीत.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्टसिटी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरात पुरेशी सीसीटीव्ही यंत्रणा नाही. त्यामुळे ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे महापालिका हद्द, उल्हासनगर ते बदलापूर आणि भिवंडी शहरात सहा हजार ५१ अत्याधुनिक सीसीटीव्ही बसविण्याचा प्रकल्प केला जात आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीला ४९२ कोटी ८९ लाख ४१ हजार १६७ रुपये इतका खर्च येणार होता. परंतु हा खर्च जीएसटी कराशिवाय नमूद करण्यात आला होता. पोलीस महासंचालक कार्यालयाने या प्रकल्पाच्या ५७५ कोटी ८७ लाख ८१ हजार ३६२ रुपये इतक्या रकमेच्या मान्यतेस राज्य शासनाकडे अहवाल सादर केला होता. त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसचे प्रकल्पाचा निधीबाबत पोलीस आयुक्तांना नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.

प्रकल्प नेमका काय आहे

या प्रकल्पात स्थिर आणि वर्तुळाकार फिरणाऱ्या कॅमेऱ्यांचा सामावेश असणार आहे. तसेच दूरवरुन किंवा अंधारात वाहनांचे क्रमांक स्पष्ट दिसतील असे एएचपीआर कॅमेरे मुख्य चौकात बसविले जाणार आहेत. वाहनांच्या वेगाची नोंद करणाऱ्या आरएलव्हीडी कॅमेऱ्यांचाही यात सामावेश असेल. हे कॅमेरे ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षास जोडले जाणार आहेत.

कोणत्या शहरात किती कॅमेरे

ठाणे ते दिवा – ३,१६३

भिवंडी – १,३४७

उल्हासनगर ते बदलापूर – १५४१

एकूण – ६०५१

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State government will install more than six thousand cctvs in cities of thane to badlapur and bhiwandi excluding kalyan dombivli sud 02