मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना भोंगे न काढल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिली आहे. दुसरीकडे त्यांनी मदरशांमध्ये गैरप्रकार सुरु असल्याचाही आरोप केला. यानंतर होणाऱ्या आरोपांना राज ठाकरे आता ठाण्यात सभा घेत उत्तर देणार आहेत. मात्र त्याआधीच वातावरण तापल्याचं दिसत आहे.
मुंब्रा येथील डुमरीपाडा परिसरात मनसेची शाखा आहे. मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास तीन जणांनी या शाखेवर दगडफेक केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हाती घेतलं आहे. दरम्यान दगडफेक करणारे नेमके कोण होते याची माहिती मिळालेली नाही. पण या घटनेमुळे राज ठाकरेंच्या सभेआधी वाद होण्याची चिन्हं आहेत.
दरम्यान राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेसाठीचं परवानगी नाट्य अखेर संपलं आहे आणि या सभेचा दिवस पोलिसांच्या परवानगीसह निश्चित झाला आहे. ठाण्यामधील मनसेची ९ एप्रिल रोजी होणारी सभा रद्द झाली असून ती आता १२ एप्रिल रोजी होणार आहे.
९ एप्रिल रोजी ठाण्यात मोकळ्या जागेवर राज ठाकरे यांच्या सभेस पोलिसांनी परवानगी नाकरली होती. रस्त्यावर वाहतूक समस्या निर्माण होण्याचं कारण देण्यात आलं होतं. शिवाय, इतर कोणत्याही सभागृहात सभा घेण्याची सूचना पोलिसांकडून मनसेला करण्यात आली होती. परंतु परवानगी नाकारल्यानतंरही गडकरी रंगायतन बाहेर सभा घेण्यावर मनसे ठाम होती. त्यामुळे आता ही सभा ९ एप्रिल ऐवजी १२ एप्रिल रोजी होणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. या पत्रकारपरिषदेस मनेसेचे नेते अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, आमदार राजू पाटील आदींची उपस्थिती होती.
याप्रकरणात शाहजाद शेख (२२), शेहजान आगा (२६) आणि मोहम्मद शफीक (२६) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अंतर्गत वादातून हा प्रकार घडला आहे. यामध्ये कोणताही राजकीय वादाचा संबंध नाही, असे मुंब्रा पोलिसांनी सांगितले.