डोंबिवली- ‘इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स’ या अखिल भारतीय संस्थेची कल्याण डोंबिवलीत स्थानिक शाखा भारतीय अभियंता दिनी सुरू करण्यात आली. संरचनात्मक विषयाची साध्या सोप्या पध्दतीने माहिती अधिकाधिक नागरिकांना मिळावी. क्लीष्ट वाटणाऱ्या या विषयाचे महत्व नागरिकांना, या विषयाशी संबंधित आस्थापनांना कळावे हा ही शाखा कल्याण डोंबिवलीत सुरू करण्यामागील मुख्य उद्देश आहे, अशी माहिती या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माधव चिकोडी यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण-डोंबिवलीत प्रथमच स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्षपद ज्येष्ठ संरचनात्मक अभियंता (स्ट्रक्चरल इंजिनिअर) माधव चिकोडी यांनी स्वीकारले आहे. सचिवपदी श्रीनिवास मुदलीयार यांनी पदभार स्वीकारला आहे. संचालक मंडळात ११ संरचनात्मक अभियंत्यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> ठाणे : लिलाव बंदीमुळे कांदा महागला; घाऊक २ रुपयाने तर, किरकोळ बाजारात पाच रुपयाने दर वाढले

ज्येष्ठ अभियंता, भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवली जीमखाना येथे आयोजित या कार्यक्रमाला भारतीय संरचनात्मक अभियंता सोसायटी मुंबई विभागाचे अध्यक्ष शांतीलाल जैन, एमआयडीसीचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे आणि कल्याण परिसरातील १८० हून अधिक बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक उपस्थित होते.

‘अतिशय महत्वाचा असलेला संरचनात्मक अभियंता हा क्लिष्ट वाटणारा विषय विविध प्रकारचे कार्यक्रम करुन स्थानिक शाखेने लोकांपर्यंत पोहचविला पाहिजे. या विषयीची जागरुकता केली पाहिजे, असे जैन यांनी सांगितले.

नवीन बांधकाम विकास नियंत्रण नियमावली आल्यापासून शहरांमध्ये पुनर्विकासाचे अनेक गृहप्रकल्प सुरू आहेत. या कामांचा दर्जा आणि त्याचा टिकाऊपणा याची बांधकामधारकांकडून काळजी घेतली जाते की नाही याची माहिती घर खरेदीदार, मूळ सदनिकाधारकाला कळली पाहिजे. आयुष्याची पुंजी घरासाठी लावणाऱ्या ग्राहकाला मजबुतीचे घर मिळाले पाहिजे. तो त्याचा हक्क आहे. अशा दृष्टीने मजबुत बांधकाम ही काळाची गरज आहे, असे मत अध्यक्ष चिकोडी यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>> देहविक्री महिला पुनर्वसन प्रकल्पाच्या आशा धुसर; महिलांचे मतपरिवर्तन करणाऱ्या सामाजिक संस्थांपुढे पेच

मजबूत बांधकाम ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण संस्थेतर्फे उपलब्ध करुन दिले जाईल, असे ते म्हणाले.

इमारत धोकादायक झाली की मग लोकांना संरचनात्मक अभियंत्याकडून अहवाल आणा, असे सांगितले. त्यावेळी लोकांना संरचनात्मक अभियंता नावाची शाखा आहे हे कळते. तेव्हा हा विषय सोप्या भाषेत अधिकाधिक लोकांपर्यंत गेला पाहिजे. बांधकाम क्षेत्रातील मंडळींना या शाखेच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. इमारतीची संरचना मजबूत असलीच पाहिजे, असे मत वानखेडे यांनी व्यक्त केले. बहुमजली इमारतीमधील प्रगतीचे विविध टप्पे या विषयावर ज्येष्ठ संरचनात्मक अभियंता वत्सल गोकाणी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला अखिल भारतीय संरचनात्मक सोसायटीचे मानद सचिव हेमंत वडाळकर, क्षेत्रीय व्यवस्थापक हर्ष पाठक, विभागीय तंत्रज्ञ प्रमुख रोहित पंड्या उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Structural engineers institution center in kalyan dombivli says madhav chikodi zws