ठाणे: ठाणेकरांना वाहतूकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशातून मुंबईपाठोपाठ ठाणे शहरातही हवाई टॅक्सी (पाॅड) प्रकल्प राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून या प्रकल्पासाठी एका खासगी कंपनीमार्फत सर्वेक्षण करण्याबरोबरच आवश्यक त्या परवानगी घेण्यात येणार आहेत. या कामासाठी ठाणे महापालिकेने संबंधित कंपनीला परवानगी दिल्याने हवाई टॅक्सी प्रकल्प उभारणीच्या दिशेने पहिले पाऊल पडल्याचे चित्र आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखाच्या पुढे गेली आहे. ठाणे शहराचे दिवसेंदिवस नागरिककरण होत असून यामुळे शहरातील लोकसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या नागरिकरणाबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ झाली. त्यामुळे रस्ते मार्गांवर वाहनांचा ताण वाढून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यावर मात करण्यासाठी रस्ते रुंदीकरण मोहिम राबविण्यात आली होती. परंतु वाढत्या वाहन संख्येमुळे शहरातील कोंडी फारशी कमी होऊ शकलेली नाही.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, खारेगाव ते गायमुख खाडीकिनारी मार्ग, आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग आणि मेट्रो या सारखे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मेट्रो तसेच अंतर्गत मेट्रो प्रकल्पापाठोपाठ आता हवाई टॅक्सी (पाॅड) प्रकल्प राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पाकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी घेणे आणि सर्वेक्षण करण्याचे काम न्यूट्रॉन ईव्ही मोबिलिटी लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात येणार असून त्यासाठी ठाणे महापालिकेने परवानगी दिली आहे.
चौकटदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथील वडोदरा येथे हवाई टॅक्सी चा प्रायोगिक प्रकल्प राबवला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात मंत्री सरनाईक यांना निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी गुजरात दौऱ्यावर या प्रकल्पाची पाहणी केली. यानंतर मंत्री सरनाईक यांनी अशाच प्रकारचा प्रयोग ठाणे व मीरा -भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये करण्याबाबत पुढाकार घेतला आहे.
न्यूट्रॉन ईव्ही मोबिलिटी लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरात हवाई टॅक्सी प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घोडबंदर रोड वरील भाईंदर पाडा येथे विहंग हिल्स परिसरातील ४० मीटर रस्त्यावर हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याची सुचना पालिकांना केली आहे. या प्रकल्पासाठी महापालिका अथवा शासनाचा एक रुपये खर्च होणार नाही. तसेच शहरातील भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.