ठाणे : ठाणे लोकसभेतील शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे उमेदवार खासदार राजन विचारे हे एका कार्यक्रमात एकमेकांसमोर आले. दोन्ही गटामध्ये विस्तव जात नसल्याने आता प्रतिस्पर्धी उमेदवार समोरा-समोर आल्याने काय होईल अशा बुचकळ्यात कार्यकर्ते होते. परंतु दोन्ही उमेदवारांनी एकमेकांसोबत हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या. सुमारे अडीच वर्षानंतर दोन्ही नेते एकमेकांसमोर येत हस्तांदोलन करत असल्याने कार्यकर्त्यांनाही हायसे वाटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मुशीत ठाण्यातील अनेक नेते घडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, माजी महापौर नरेश म्हस्के हे त्यापैकी आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजन विचारे यांनी ठाकरे यांच्यासोबत निष्ठा दाखवित त्यांना समर्थन दिले आहे. तर, नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. खासदार राजन विचारे यांना ठाकरे यांनी ठाणे लोकसभा लढविण्याची तिसऱ्यांदा संधी दिली आहे. त्यामुळे राजन विचारे यांनी प्रचाराला सुरूवात केली होती. तर बुधवारी नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे आता ठाणे लोकसभेत राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत शक्तिप्रदर्शन करत श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बाळकूम येथे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर यांच्या माध्यमातून साईबाबा मंदिराच्या लोकार्पणाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकार्पण कार्यक्रमात बुधवारी रात्री खासदार राजन विचारे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचवेळी नरेश म्हस्के हे देखील तेथे आले. त्यामुळे दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर आले होते.

हेही वाचा – म्हस्के, सरनाईकांसमोरच नाईक समर्थकांची घोषणाबाजी

ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटात विस्तव जात नाही. नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक आरोप केले आहेत. तर राजन विचारे यांच्याकडूनही शिंदे गटावर टीका केली जाते. बुधवारी हे दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आल्याने काय होईल या बुचकळ्यात पडले होते. परंतु या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना हस्तांदोलन केले. यावेळी शिंदे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी होते. दोन्ही उमेदवारांनी राज्याच्या सुसंस्कृतीचे दर्शन दिल्याने कार्यकर्त्यांना हायसे वाटले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group rajan vichare and shinde group naresh mhaske face each other ssb