ठाणे : ठाणे महापालिका निवडणुक येत्या काही महिन्यात होणार असल्याने शहरात महायुतीतील शिंदेची शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वाक् युद्ध रंगले असतानाच, ठाण्यातील शंभर वर्षे जुन्या स्पोर्टींग क्लब कमिटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे चित्र अधिक ठसठशीतपणे दिसून येत आहे. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेविरुद्ध भाजप, उबाठा, मनसे असा सामना रंगल्याचे दिसून येत आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेल्या शतायुषी स्पोर्टींग क्लब कमिटीची त्रैवार्षिक निवडणुक शुक्रवार, १९ सप्टेंबरला सेंट्रल मैदावरील क्लबच्या सभागृहात होणार आहे. सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत होणाऱ्या या निवडणुकीत क्लबचे १५७ सदस्य १८ उमेदवारांमधून ९ कार्यकारिणी सदस्यांची निवड करतील. या निवडणुकीसाठी सुरुवातीला २४ उमेदवारांनी आपले निवडणुक अर्ज दाखल केले होते. सोमवारी, नावे मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. विसर्जित कार्यकारिणीतील ९ पैकी ८ सदस्य पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १ ऑक्टोबर १९२५ ते ३० सप्टेंबर २०२८ या कालावधीकरता होत असलेल्या या निवडणुकीत क्लबच्या इतिहासात सुषमा माधवी यांच्या माध्यमातून एक महिला निवडणुकीसाठी उभी आहे.
अशी होणार लढत
मागील कार्यकारिणी मंडळातील अध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्या नेतृत्वाखाली स्पोर्टींग कार्यशील पँनेलमधून सुषमा मढवी यांच्यासह विद्यमान सचीव दिलीप धुमाळ, खजिनदार डॉ योगेश महाजन, सहसचिव सुशील म्हापुस्कर यांच्यासह क्लबचे जेष्ठ सदस्य किशोर ओवळेकर, उबाठाचे पदाधिकारी सचिन गोरीवले, मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे, माजी उपाध्यक्ष अतुल फणसे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या पॅनेलसमोर विकास रेपाळे यांच्या नेतेपदाखाली स्पोर्टींग क्लब पँनल निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यात विकास रेपाळे यांच्याजोडीने विलास जोशी, श्रावण तावडे, ॲड कैलास देवल, मनोज यादव प्रफुल्ल वैद्य, किरण साळगावकर, जितेंद्र मेहता, सतीश नाचणे यांनी आपले आव्हान उभे केले आहे. कमलाकर मराठे हे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर उमेश ग्रोव्हर आणि प्रल्हाद नाखवा हे यावेळीही सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
शिंदेच्या शिवसेनेविरुद्ध भाजप, उबाठा, मनसे
स्पोर्टींग कार्यशील पँनेलमधून भाजपचे माजी नगरसेवक डाॅ. राजेश मढवी, शिवसेना (उबाठा) चे पदाधिकारी सचिन गोरीवले, मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे हे एकत्रितपणे निवडणुक लढवित आहेत. त्याच्याविरोधातील स्पोर्टींग क्लब पँनलमधून शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे हे निवडणुक लढवित आहेत. त्यांच्या पॅनलमधून यापुर्वी भाजपचे पदाधिकारी प्रशांत गावंड यांनी निवडणुक लढविले होती. यंदाही ते रेपाळे यांच्या पॅनलमधून निवडणुक लढणार होते. मात्र, अचानकपणे त्यांनी माघार घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. यामुळे या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेविरुद्ध भाजप, उबाठा, मनसे असा सामना रंगल्याचे दिसून येत आहे.
क्रिकेट आणि खेळाच्या मैदानाच्या प्रलंबित कामांसाठी आम्ही ही निवडणुक लढवित आहोत. या संस्थेची निवडणुक असून यात कोणतेही पक्षीय राजकारण नाही. सर्वसमावेशक कामे करणे हा आमचा उद्देश आहे, अशी प्रतिक्रीया विकास रेपाळे यांनी दिली. तर, स्पोर्टींग क्लब ही १०१ वर्षे जुनी संस्था असून त्याची निवडणुक होत आहे, त्यात कोणतेही पक्षीय राजकारण नाही. उमेदवारांमुळे तसे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात तसे काहीच नाही, अशी प्रतिक्रिया डाॅ. राजेश मढवी यांनी दिली.