ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गणेश मुर्ती तसेच देवी मुर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने कृत्रिम तलावांसह लोखंडी टाक्यांची उभारणी केली होती. परंतु कळवा परिसरात ठेकेदाराने कृत्रिम तलावाऐवजी लोखंडी टाक्याची उभारणी केली आणि देयके मात्र कृत्रिम तलवांची सादर केल्याचा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी त्यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ठाणे महापालिकेने गणेश मुर्ती तसेच देवी मुर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने कृत्रिम तलावांसह लोखंडी टाक्यांची उभारणी केली होती. तसेच छटपूजेच्या विधीसाठी महापालिकेमार्फत कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात येते. तलावांचे प्रदुषण रोखण्यासाठी पालिकेकडून कृत्रिम तलाव आणि लोखंडी टाक्यांंची संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यास नागरिकांकडून गेल्या काही वर्षांपासून प्रतिसादही मिळत आहे. यंदाही पालिकेने कृत्रिम तलाव आणि लोखंडी टाक्यांची संकल्पना राबविली होती. परंतु या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे.
१८ लाखांची टाकी
कळवा प्रभाग समिती अंतर्गत खाडी किनारी असलेल्या निसर्ग उद्यान परिसरात गणपती विसर्जनाकरिता १८ लाख रुपये खर्च करून कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम ठेकेदाराला दिले होते. मात्र या ठेकेदाराने कृत्रिम तलावा ऐवजी तिथे लोखंडी टाक्या बसवल्या. आता या ठेकेदाराने कृत्रिम तलाव बनविल्याचे भासवून ठाणे महापालिकेला देयक सादर केले आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप संदीप पाचंगे यांनी केला आहे. कामे न करताच ठेकेदारांनी ठाणे महापालिकेला बोगस देयके सादर केल्याच्या घटना यापूर्वी देखील उघडकीस आल्या आहेत. असाच पुन्हा घडलेला प्रकार संदीप पाचंगे यांनी आता उघडकीस आणला आहे.
चौकशीची मागणी
कळवा प्रभाग समिती अंतर्गत निसर्ग उद्यान परिसरात गणेश विसर्जना करिता कृत्रिम तलाव तयार बनण्याचे काम एका ठेकेदाराला दिले होते. मात्र ठेकेदाराने कृत्रिम तलाव तयार न करता लोखंडी टाक्या बसवून आता कृत्रिम तलाव बनविले असल्याचे बोगस देयक ठाणे महापालिका प्रशासनास सादर केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि महापालिकेची फसवणूक करणाऱ्या संबंधित ठेकेदारासह दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पाचंगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत सोनाग्रा यांच्याकडे केली आहे.