बदलापूर : जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने बारवी धरणात २५ जुलैपर्यंत तब्बल ८३ टक्के पाणीसाठा झाला होता. मात्र दोन तीन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने नंतर दडी मारली. परिणामी वेगाने भरणाऱ्या बारवी धरणात होणारा पाणी साठाही मंदावला. त्यामुळे ४ ऑगस्ट उजाडले तरी बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू शकलेले नाही. तरीही सध्या बारवी धरणात ९५ टक्के पाणीसाठा आहे. सध्या धरण ७२.१४ मीटरपर्यंत भरले आहे. येत्या काळात पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यातील नागरी, औद्योगिक तहान भागवण्याचे काम बारवी धरणाच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक असते. शासकीय यंत्रणांसह जिल्ह्याचे डोळे बारवी धरण भरण्याकडे लागलेले असतात. उन्हाळ्यात याच धरणाचा पाणीसाठा खालावल्यास त्याचा फटका पाणी कपातीच्या रूपात बसतो. यंदाच्या वर्षात मात्र परिस्थिती वेगळी होती. बारवी धरणात यंदाच्या मे महिन्यात तुलनेने बाष्पीभवन कमी झाले. उलट धरणात पाणीसाठाच वाढला. मे महिन्याच्या सुरूवातीला बारवी धरण क्षेत्रात पश्चिमी विक्षोभामुळे पडणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात भर पडली. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस अवकाळी आणि पूर्व मोसमी पावसामुळे धऱणातील पाणीसाठा वाढला.

जुन आणि जुलै महिन्यात तर समाधानकारक पाऊस झाला. मात्र या काळात धरणाती पाणी साठाही वेगाने वाढला. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बारवी धरण वेगाने भरू लागले. त्यामुळे २५ जुलै रोजी बारवी धरण कोणत्याही क्षणी ओसांडून वाहू शकते, अशी शक्यता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रशासनाला होती. त्यानुसार एमआयडीसी प्रशासनाने धरण आणि बारवी नदी काठच्या नागरिकांना, स्थानिका प्रशासलाना तसा खबरदारीचा इशाराही दिला होता. २५ जुलै रोजी धरणात ८३ टक्के पाणीसाठा होता. तर त्यांतर २६ जुलै रोजी हाच पाणीसाठा ८५.२५ टक्क्यांवर पोहोचला. तर २८ जुलै रोजी ९०.५१ टक्के इतका पाणीसाठा होता. त्यावेळी धरणात ३०६.७० दशलक्ष घनमीटर इतके पाणी होते.

मात्र त्यानंतर बारवी धरणात पाणी साठा मंदावला. बारवी धरण आणि आसपासच्या परिसरात पावसाने काहीअंशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळेच धरणात होणारा पाणीसाठा थंडावल्याचे बोलले जाते. त्यामुळे ३० जुलै रोजी धरणात ९१.५८ टक्के, १ ऑगस्ट रोजी ९३.९६ टक्के तर सोमवारी ४ ऑगस्ट रोजी ९५.२५ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. तरीही बारवी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास येत्या काही दिवसातच बारवी धरण भरून वाहू शकते. मात्र येत्या काळात पाऊस मंदावण्याची शक्यता आहे, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.