Thane Blood Shortage : ठाणे : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान रक्तदान शिबिरे कमी झाल्याने रक्तदात्यांची संख्या घटली. परिणामी, ठाणे जिल्ह्यातील सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा झपाट्याने घटत असून सध्या केवळ पाच दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक होता. ज्यामुळे रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही गंभीर बाब कळताच ठाण्यातील ह्या रक्ताच्या तुटवड्यावर इलाज करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात रक्तदानाचा महाकुंभ मेळा भरवला. पक्षभेद विसरून ठाणेकर एकवटले आणि यामुळे रुग्णांना मोठा आधार मिळाला.
ठाणे जिल्ह्यातील सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा झपाट्याने कमी झाला असून सध्या फक्त पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक होता. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे झालेली नसल्यामुळे रक्तदात्यांची संख्या घटली होती. त्यामुळे अपघातग्रस्त, कर्करोगग्रस्त, गर्भवती महिला आणि डायलिसिसवर असलेल्या रुग्णांना आवश्यक तेवढे रक्त उपलब्ध न राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. या गंभीर परिस्थितीवर जिल्हा आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात केले होते.
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले होते.
महाकुंभाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणार्या रक्ताचा तुटवडा भासू लागला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडत होता. दरम्यान, मुबलक रक्तसाठा उपलब्ध न झाल्याने रुग्णांना लागणाऱ्या रक्तासाठी नातेवाईकांना धावाधाव करावी लागत होती. याबाबतची माहिती कळताच मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी रक्तदानाचा महाकुंभ मेळा भरवून नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन सोशल मीडियावरून केले होते. ठाणे महापालिकेचे कळवा रुग्णालय आणि ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य उपक्रम पार पडला. या उपक्रमाला ठाणेकर नागरिक, महाविद्यालयीन युवक-युवती आणि महाराष्ट्र सैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तब्बल ४६५ बाटल्या रक्तसंकलन
या रक्तदान शिबिरात सर्व समाजघटकांतील नागरिकांनी सहभागी होत “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला अधोरेखित केले. दिवसभरात ४६५ बाटल्या रक्ताचे संकलन करून ठाण्यातील रक्तपेढ्यांवरील ताण कमी करण्यात मोठा हातभार लागला. या उपक्रमामुळे अपघातग्रस्त, कर्करोगग्रस्त, गर्भवती महिला आणि डायलिसिसवरील रुग्णांसाठी तातडीने रक्त उपलब्ध होऊ शकणार आहे.
पुढील एक वर्ष पुरेल इतका रक्तसाठा जमा
ठाण्यात रक्ताचा पुरवठा कमी झाल्याची बाब कळताच तातडीने पुढाकार घेऊन रक्तदानाचा महाकुंभ आयोजित करण्याचे ठरवले. त्यानंतर, पक्षाचे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या निर्देशानुसार सर्व कार्यकर्ते कामाला लागले. ठाणेकर युवक आणि नागरिकांनी देखील या मोहिमेला पाठींबा दर्शवित मोठ्या संख्येने रक्तदान केले. विशेष म्हणजे सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र येत पुढील एक वर्ष पुरेल इतका रक्तसाठा जमा करण्यासाठी सामुहिक योगदान दिले, असे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.
