Thane ठाणे – ठाणे शहरात सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. गणपतीच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे सर्वांचीच खरेदीसाठी लगबग सुरु आहे. तर, अनेकांनी कोकणात जाण्याची वाट धरली आहे. सोमवारी सकाळपासून अनेक कोकणवासी कोकणाकडे रवाना झाले आहेत. परंतु, सकाळपासून सुरु असलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून आले.

मागील आठवड्यात ठाणे जिल्ह्याला रेड अर्लट जारी केला होता. त्यामुळे १८ आणि १९ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला होता. यामध्ये ठाणे शहरात सर्वाधिक पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तर, अनेक सखल भागात पाणी साचले होते. तसेच काही महामर्गांवर देखील पाणी साचल्यामुळे त्याचा परिणाम, वाहतूकीवर झाला होता. त्यानंतर, काही दिवसांपासून शहरात पावसाचा जोर कमी झाला आहे. अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. परंतु, पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या काळात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

रविवारी सायंकाळपासून ठाणे शहरात पावसाची संततधार सुरु झाली आहे. सोमवारी सकाळपासून देखील पावसाची संततधार सुरु असल्याचे दिसत आहे. एकीकडे गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी धावपळ सुरु आहे. तर, काही कोकणवासी सोमवारी कोकणात जायला निघाले आहेत. या सर्वांना संततधार पावसाचा फटका बसत आहे. तर, फेरीवाले विक्रेत्यांनचे देखील या पावसात साहित्य भिजत असून नुकसान होत आहे. ते पावसापासून बचाव करण्यासाठी आडोसा शोधून उभे राहत असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.

सोमवारी सकाळपासून बाजारात खरेदीला आलेल्या नागरिकांची धांदल उडाली आहे. तर, नोकरदार वर्गाला देखील या पावसामुळे त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे शहरात गेल्या २४ म्हणजेच रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २७. ६७ मिमी पाऊस कोसळल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती विभागाकडे करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाकडून नागरिकांना आवाहन

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला मंगळवार आणि बुधवार पिवळा (Yellow) अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या जोरदार पावसानंतर, काही दिवस विश्रांती मिळाल्यानंतर हा इशारा जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याचे अद्ययावत अंदाज तपासत राहावेत आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.