Thane Municipal Corporation Water Cut News : ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे धरणातील जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. असे असले तरी ठाणे महापालिका क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा गुरूवारी दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ आता भातसा नदीच्या पात्रातुन होणाऱ्या पाणी पुरवठ्यात ३० टक्के कपात झाल्याने ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६२१ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने मुंबई महापालिकेकडे ५० दशलक्षलीटर वाढीव पाणी देण्याची मागणी केली होती. परंतु मुंबई महापालिकेने ठाणे महापालिकेची मागणी मान्य केली पण, केवळ ५ दशलक्षलीटर इतकेच वाढीव पाणी उपलब्ध करून दिले आहे.
गुरुवारी एमआयडीसीचा पाणी पुरवठा बंद
ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरूस्तीचे अत्यंत महत्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे शहराला होणारा १३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा गुरूवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यत बंद राहणार आहे. यामुळे ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामध्ये दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसेच वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर, मानपाडा प्रभागसमितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागांचा समावेश आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिकेने कळविले आहे.
ठाणे: भातसा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा, आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. नदीपात्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. https://t.co/2jrmCKvB4K
— LoksattaLive (@LoksattaLive) August 20, 2025
(सौजन्य – लोकसत्ता टीम) pic.twitter.com/D9f27k7PNU
पाणी पुरवठ्यात २५ ते ३० टक्के कपात
ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा शहराच्या विविध भागात करते. त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्वाचा स्रोत मानला जातो. या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातुन पाणी उचलते आणि त्याचा शहरात पुरवठा करते. परंतु या पाणी पुरवठ्यात २५ ते ३० टक्के कपात झाली आहे.
कपातीचे कारण काय ?
मागील तीन दिवसापासून भातसा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा, आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. नदीपात्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पंपिंग स्टेशन मध्ये पाणी शिरल्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नाही. तसेच, गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्यामुळे ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा २५ ते ३० टक्के कमी झाला आहे. पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम करण्यात येत आहे. या कारणामुळे शहरामध्ये अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. या काळात पाणी उकळून प्यावे आणि पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.