ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील विद्युत खांबांवर जाहिराती प्रदर्शित करण्याच्या कामाचा ठेका प्रशासनाने आठ वर्षांपुर्वी दिला होता. परंतु करोना काळात जाहिराती बंद झाल्यामुळे ठेकेदाराच्या उत्पन्नावर परिणाम झाला आणि त्याने हे काम बंद केले. यानंतर पालिकेकडून चार वर्षांपासून काढण्यात येत असलेल्या या कामाच्या निविदेकडे ठेकेदार पाठ फिरवत असल्यामुळे पालिकेने जुन्या ठेकेदारामार्फत जाहिरात प्रदर्शित करण्याचे काम सुरू ठेवल्याचे चित्र आहे. निविदेविनाच कुणाच्या आर्शिवादाने हे काम सुरू आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात शौचालये उभारणी करून देण्याच्या बदल्यात मोक्याच्या जागांवर जाहीरात प्रदर्शन हक्क दिल्याचा प्रकल्प यापुर्वीच वादात सापडला आहे. असे असतानाही शहरातील विद्युत खांबांवर जाहिरात प्रदर्शित करण्याच्या कामाचा ठेका पालिकेने १ एप्रिल २०१८ मध्ये दिला होता. तीन वर्षांकरीता विद्युत खांबांवर जाहिरात प्रदर्शित करण्याचे हक्क ठेकेदाराला देण्यात आले होते.
ठेकेदाराकडून जाहिरात हक्काच्या बदल्यात १० कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहेत. परंतु तीन वर्षांच्या कालावधी संपुष्टात येण्याआधीच करोना काळ सुरू झाला. या काळात जाहिराती बंद झाल्याने ठेकेदाराच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे त्याने ठेका संपुष्टात येण्याआधीच काम बंद केले, अशी माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने दिली.
करोना काळानंतर पालिकेने ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यावरील ३ हजार ८१५ विद्युत खांबांवर जाहिरात प्रदर्शन हक्क देण्याची योजना पालिकेने तयार केली होती. या योजनेनुसार ठेकेदाराला खांबांवर ४ बाय ६ आकाराचे जाहीरातीचे फलक उभारण्यास परवानगी दिली जाणार होती. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना राबविली जाणार होती. त्यातून पालिकेला १८ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. त्यासाठी २९ जुलै २०२२ मध्ये पहिली निविदा पालिकेने काढली होती. शेवटची निविदा ६ फेब्रुवारी २०२५ रोजी काढण्यात आली होती. आतापर्यंत सात वेळा निविदा काढण्यात आली आहे. परंतु त्यास ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
जुन्याच ठेकेदारामार्फत काम सुरू
पहिल्यांदा निविदा काढली, त्यावेळेस ठेकेदारांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. यानंतर पालिकेने ठेका संपुष्टात आलेल्या जुन्याच ठेकेदारामार्फत जाहिरात प्रदर्शित करण्याचे काम सुरूच ठेवले. निविदेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जुन्याच ठेकेदारामार्फत हे काम करण्यात येत असून तो पालिकेला उत्पन्नाचा वाटा देत आहे, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नव्या निविदेनुसार संबंधित ठेकेदाराकडून पालिकेला तीन वर्षांसाठी १८ कोटी देणे अपेक्षित आहे. परंतु इतके उत्पन्न मिळत नसल्यामुळे पालिकेचे नुकसान होत आहे.