ठाणे : ठाण्यात मागील तीन दिवसांत सायबर गुन्हेगारांनी विविध अमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वेगवेगळ्या प्रकरणात चार गुन्हे दाखल झाले असून सायबर गुन्हेगारांकडून फसवणूकीचे प्रकार सुरुच असल्याचे या गुन्ह्यांवरून सिद्ध होते. फसवणूक झालेल्या चौघांपैकी दोनजण सेवानिवृत्त आहेत. यातील पहिली घटना शहापूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत झाली.
त्याला अर्धवेळ कामाच्या माध्यमातून १५०० ते २००० रुपये देतो असे अमीष दाखवून १३ लाख ६५ हजार ५७६ रुपयांची फसवणूक करण्यात आली. तो ठाण्यातील एका कंपनीत कामाला होता. त्याला ऑनलाईनरित्या एका ॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर १६ नोव्हेंबरला गुन्हा दाखल झालेला आहे. दुसरे प्रकरण कासारवडवली भागात राहणाऱ्या ८१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीची समाजमाध्यमाद्वारे एका ८१ वर्षीय व्यक्तीची ८६ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
त्यांना अभासी चलनाचे अमीष दाखविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी एका ॲपच्या माध्यमातून ऑनलाईनरित्या पैसे गुंतविले होते. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिसरे आणि चौथे प्रकरण हे चितळसर भागातील आहे. यातील तिसऱ्या प्रकरणात शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची बतावणी करुन ३०० टक्के मासिक परतावा मिळेल असे सांगत एका ४१ वर्षीय सल्लागाराची ३० लाख रुपांची फसवणूक झाली आहे. तर चौथ्या प्रकरणात ७० वर्षीय व्यक्तीची ५८ लाख रुपयांना फसवणूक झाली. त्यांना देखील गुंतवणूकीच्या मोबदल्यात जादा परताव्याचे अमीष दाखविण्यात आले होते. फसवणूक झालेल्या सर्वांनी ऑनलाईनरित्या त्यांच्या बँक खात्यातून पैसे पाठविल्याचे उघडकीस आले आहे.
