ठाणे : एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ठाणे जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्यानुसार, १ जुलै ते ११ जुलै या दहा दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात २०० शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात जिल्हा विभागाला यश आले आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच १०९ मुलांचा सहभाग असल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रोजगारासाठी अनेक कुटूंबे येत असतात. या कुटुंबामध्ये शाळकरी मुलांचा समावेश असतो. या वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे आणि त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती असते. त्यामुळे शाळाबाह्य, स्थलांतरित आणि शाळेत अनियमित असलेल्या बालकांची दरवर्षी जिल्हास्तरावर शोध मोहीम घेण्यात येते. त्यानुसार, यंदाच्या वर्षी १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

यंदा जिल्ह्यातील सर्व वीटभट्ट्या, दगडखाणी, बांधकामाची ठिकाणे, रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी, उपहारगृह अश्या विविध ठिकाणी शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात येत आहे. या मोहिमेत मागील १० दिवसात जिल्ह्यात २०० शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. जिल्हा शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार शाळाबाह्य बालकांमध्ये मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. मुलांची संख्या १०१ तर, मुलींची संख्या ९९ इतकी असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

महापालिका आणि तालुका निहाय्य शाळाबाह्य मुलांची आकडेवारी

महापालिका/ तालुका                  मुले   मुली

नवीमुंबई पालिका                       १८     २०

भिवंडी पालिका                          १८ ३५

मिराभाईंदर पालिका                   २३ १३

कल्याण-डोंबिवली पालिका          २१ १४

उल्हासनगर                             ०८ ०६

भिवंडी तालुका                         ०५ ०४

शहापूर तालुका                         ०८ ०७

एकूण                                     १०१ ९९