ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यात २८ सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जारी केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले होते. तर, २९ सप्टेंबर ऑरेंज आणि ३० सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना आणि कार्यालय प्रमुखांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
या अतिवृष्टीच्या दिवसात कोणतिही जिवीतहानी होऊ नये यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून सर्व विभागांना तयारीत राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाकी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवर पडलेली झाडे तातडीने बाजूला करण्यासाठी वूड कटर आणि जेसीबी तयार ठेवावेत. तसेच दरडी कोसळल्यास तात्काळ कार्यवाही करण्यासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ तयार ठेवावी. मत्स्यव्यवसाय विभागाने हवामानाचा अंदाज मच्छिमारांपर्यंत पोहोचवावा आणि त्यांना समुद्रात जाण्यापासून थांबवावे. सर्व विभागांनी त्यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापनाची साधने सुस्थितीत ठेवावीत आणि शोध व बचाव पथके तयार ठेवावीत.
जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी ‘दामिनी ॲप’ आणि ‘सचेत ॲप’ डाऊनलोड करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना विजा पडण्याची आणि हवामानाची आगावू माहिती मिळू शकेल. कोणत्याही आपत्कालीन घटनेची माहिती तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाला ०२२-२५३०१७४० किंवा ९३७२३३८८२ या क्रमांकावर कळवावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या कालावधीत सर्व विभागांनी दक्ष राहून तसेच एकमेकांशी समन्वय साधून काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने यांनी केले आहे.