ठाणे : भारतात बसून परदेशातील विशेषत: अमेरिकेतील नागरिकांची बनावट काॅल सेंटरच्या आधारे फसवणूक करणाऱ्यांचे जाळे आता राज्यभर पसरले आहे. या बनावट काॅल सेंटरमध्ये धागेदोरे पोलीस अधिकाऱ्यापर्यंत पोहचू लागले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी येथे झालेल्या बनावट काॅल सेंटर येथील धाडीनंतर अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आरोपींच्या संपर्कात असलेल्या राज्यातील चार वरिष्ठ अधिकारी रडारवर असल्याचे कळते आहे. विदेशी नागरिकांच्या फसवणूकीची रक्कम शेकडो कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे. हे बनावट काॅल सेंटरचे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसेल की, छोटे मासेच गळाला लागतील हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

नाशिक येथील इगतपूरीमध्ये काही महिन्यांपूर्वी बनावट काॅल सेंटरवर छापा पडला होता. या छाप्यानंतर अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणल्याची चर्चा आहे. ईडीच्या चौकशीत अमेरिका, ब्रिटन आणि कॅनेडियन नागरिकांची फसवणूक करून मिळवलेल्या गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचाही शोध घेतला जाणार आहे. मुख्य आरोपींशी असलेल्या संबंधांमुळे चार पोलिसांची चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी लाच देऊन किंवा बनावट सायबर फसवणुकीच्या कारवायांमध्ये सक्रियपणे मदत करून या बनावट कॉल सेंटरना संरक्षण दिले असल्याचा आरोप होत आहे.

इगतपुरीत उघडकीस आलेल्या बनावट कॉल सेंटर प्रकरणाने राज्यातील पोलिस यंत्रणेला मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेला मनी लाँडरिंगचा गुन्हा आता केवळ अटक झालेल्या आरोपींपुरता मर्यादित न राहता, त्यामागील संरक्षणकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांचा सहभाग?

सीबीआयच्या प्राथमिक तपासात काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मालमत्ता व्यवहारांचे, त्यांच्या निकटवर्तीयांच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टी डील्सचे, तसेच हवाला मार्गे फिरवलेल्या निधीचे ठोस पुरावे समोर आले आहेत. काही अधिकाऱ्यांनी या रॅकेटमधून मिळवलेल्या पैशांचा वापर करून मुंबई, नाशिक, पुणे आणि नवी मुंबई परिसरात मालमत्ता खरेदी केल्याचे म्हटले जाते. काही व्यवहार शेल कंपन्यांच्या माध्यमातून, तर काही थेट त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने करण्यात आल्याचे समजते आहे. केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सीबीआयला हे प्रकरण तपासण्यास सांगण्यात आले. आरोपींना निधी जमा करण्यात मदत करण्यात बँक अधिकारी देखील सहभागी असल्याने सीबीआयने या कॉल सेंटरची चौकशी करण्याची व्याप्ती शोधली.

प्रकरण काय होते

सीबीआयने नाशिकमधील इगतपुरी रिसॉर्टमध्ये भाड्याने घेतलेल्या जागेत कार्यरत असलेल्या अमेरिकन आणि कॅनेडियन नागरिकांना लक्ष्य करणारे कॉल सेंटर उध्वस्त केले. ऑपरेटर्सनी ६२ लोकांना कामावर ठेवले होते. आरोपी महिन्याला सुमारे ४ कोटी रुपये कमवत असल्याचे सीबीआयला आढळले. त्यांनी मुंबईतील पाच रहिवाशांना अटक केली आणि छाप्यांमध्ये १.२ कोटी रुपये बेहिशेबी रोख रक्कम, ५०० ग्रॅम सोने आणि १ कोटी रुपये किमतीच्या ७ लक्झरी कार जप्त केल्या.

ठाणे ते संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर येथेही मंगळवारी पोलिसांनी एका बनावट काॅल सेंटरवर धाड टाकली. अमेरिकेतील नागरिकांना या काॅलसेंटरमधून फसविले जात होते. सुमारे आठ ते नऊ वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी अशाचप्रकारे एका बनावट काॅल सेंटरवर छापा टाकला होता. पूर्वी असे काॅल सेंटर चालविले जात होते. परंतु ही कारवाई मोठी होती. त्यानंतर काॅल सेंटरच्या व्याप्ती वाढल्याचे बोलले जाते. अनेक पोलीस अधिकाऱ्यांना बनावट काॅल सेंटरबद्दल माहिती मिळाल्याचे आरोप होत आहे. ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर येथून या बनावट काॅल सेंटरचे रॅकेट चालविले जात होते. त्यामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची नावे आजही चर्चेत येऊ लागली आहेत.