ठाणे : गणेशमुर्ती आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी ठाण्यात मिरवणूका निघतात. तसेच विसर्जन स्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अवजड वाहनांच्या प्रवेशामुळे शहरात वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतुक पोलिसांनी गणेशोत्सवात अवजड वाहनांना निर्बंध लागू केले आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत दिवसा अवजड वाहनांना बंदी असणार असून केवळ रात्री १० नंतर प्रवेश दिला जाईल. तर गणेशमुर्ती विसर्जनाच्या दिवशी अवजड वाहनांना पूर्णत: प्रवेशबंदी असेल. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामुळे नागरिकांना अवजड वाहनांच्या वाहतुकीपासून दिलासा मिळणार आहे.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी भागात मोठ्याप्रमाणात गोदामे आहेत. त्यामुळे उरण येथील जेएनपीटी बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने भिवंडीतील गोदामांमध्ये जात असतात. तसेच गुजरात, नाशिकच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहने मुंबई नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण आणि घोडबंदर मार्गे वाहतुक करत असतात. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच या कालावधीत प्रवेश असतो. असे असले तरी अनेकदा अवजड वाहनांची या वेळेव्यतिरिक्त नियमबाह्य पद्धतीने घुसखोरी होत असते. त्यामुळे शहरात वाहतुक कोंडीचा सामना ठाणेकरांना सहन करावा लागतो. गणेशोत्सव कालावधीत गणेशमुर्ती विसर्जनाच्या दिवशी मिरवणूका निघत असतात. या कालावधीत वाहतुक कोंडी किंवा अपघात होऊ नये म्हणून ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत.

हेही वाचा : ठाणे: अवजड वाहनांच्या नियमावलीचे काटेकोर पालन करा, महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

गणेशोत्सवाच्या कालावधीत अवजड वाहनांना केवळ रात्रीच्या वेळेत प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे विसर्जन कालावधी व्यतिरिक्त अवजड वाहने रात्री १० ते सकाळी ६ यावेळेत प्रवेश करू शकतील तसेच विसर्जनाच्या दिवशी अवजड वाहनांना पूर्णत: प्रवेशबंदी करण्यात आली आहे, असे आदेश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत.