डोंबिवली – माॅडेलर म्हणून मिरवून, आपण खूप श्रीमंत आहोत असे दाखवून, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरूणींशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यांचा विश्वास संपादन करून मग त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रूपयांची आर्थिक फसवणूक करणारा प्रसिध्द रील स्टार शैलेश रामुगडे याला डोंंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती डोंबिवलीचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी शनिवारी माध्यमांना दिली.
शैलेशकडून पोलिसांनी एकूण ३९ तोळे सोने, एक बीएमडब्ल्यू कार, चार महागडे मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. शैलेशने आतापर्यंत एकूण तीन तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. या पीडित तरूणी स्थानिक पोलीस ठाण्यात रामुगडे विरूध्द तक्रारी करणार आहेत, असे हेमाडे यांनी सांगितले.
शैलेश रामुगडे हा ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील हिरानंदानी इस्टेट गृहसंकुलात एकटाच राहत होता. त्याचे आई, वडील हे दिवा येथील मुंब्रादेवी काॅलनी रोडवरील युगलक्ष्मी इमारत येथे राहतात. शैलेश विरूध्द यापूर्वी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल आहेत, असे हेमाडे यांनी सांगितले.
अलीकडेच डोंबिवलीतील एका तरूणीशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवून शैलेने तिच्याकडून ५१ लाख रूपये, सोन्याचे दागिने असा एकूण ९२ लाखाचा ऐवज उकळून तिची फसवणूक केली होती. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. याप्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली. तो तरूणींना बीएमडब्ल्यु गाड्या दाखवून आपण खूप श्रीमंत आहोत, असे दाखवायचा. आपण माडेलिंग क्षेत्रात काम करतो, असे शैलेश बाहेर वातावरण निर्माण करायचा.
स्वत: तरूण आणि देखणा असल्याने आपसूक तरूणी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसायच्या. एकदा तरूणी आपल्या जाळ्यात आली की मग तो त्यांना विविध कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे, सोने उकळायचा. एकदा त्याचा उद्देश पूर्ण झाला की मग तो त्यांना प्रतिसाद देणे टाळायचा. ही त्याची फसवणुकीची पध्दत होती.
यापूर्वी त्याने एका पीडितेची ४३ लाख, दुसऱ्या एका प्रकरणात २९ लाख रूपये फसवणूक केली आहे. अशाच प्रकारची एक तक्रार शैलेश रामुगडे याच्या विरूध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दाखल तक्रारीचा तातडीने तपास सुरू केला.
रील स्टार शैलेश रामुगडे याला अटक केली. शैलेशचे इन्स्टाग्रामवर एक मिलियन अनुयायी असल्याची माहिती पोलिसांनी काढली आहे. फसवणुकीतून मिळालेले सोने त्याने ठाण्यातील सोनारांना विकले होते. ते पोलिसांनी जप्त केले आहे. विष्णुनगर पोलिसांनी शैलेशचा तपास सुरू केला आहे. शैलेश आतापर्यंत किती तरूणी अन्य कोणाची फसवणूक केली आहे. या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
