ठाणे : कोपरी येथील बारा बंगला शासकीय वसाहतीमधील न्यायाधीशांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकेत छताचा भाग कोसळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करुनही विभागाने कोणतीही दुरुस्ती केली नसल्याने याप्रकरणी न्यायाधीशांच्या पतीने कोपरी पोलीस ठाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार याप्रकरणात आता गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यातील बारा बंगला परिसरातील एका इमारतीच्या सदनिकेत २०२३ पासून न्यायाधीश या त्यांच्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. इमारत जीर्ण होत असल्याने या इमारतीमध्ये राहणाऱ्या न्यायाधीशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी दिल्या होत्या. परंतु विभागाकडून इमारतीमध्ये कोणतीही डागडुजी झाली नाही. रविवारी सायंकाळी सदनिकेतील शयनगृहात अचानक मोठा आवाज झाला.

न्यायाधीशांच्या पतीने शयनगृहात पाहिले असता, छताच्या प्लास्टरचा भाग कोसळला होता. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. परंतु घनटेनंतर न्यायाधीशांच्या पतीने याबाबत कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तक्रारीच्या आधारे सार्वजनिक बांधकाम विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.