ठाणे : कोपरी परिसरात कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाची केवळ अडीच वर्षांत दुरावस्था झाल्याचा आरोप ठाणे काँग्रेसने केला होता. या आरोपांनंतर कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पाच्या दुरुस्तीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पातील दुरुस्तीची कामे कंत्राटदार स्वखर्चाने करणार आहे. तसे निर्देश कंत्राटदारास दिल्याचे ठाणे स्मार्ट सिटीचे सीईओ संदीप माळवी यांनी स्पष्ट केले आहे.

कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मार्च-२०२३ मध्ये झाला. येथे मोठया प्रमाणात नागरीकांची वर्दळ असून सुविधांचा वापर नागरीकांकडून सातत्याने सुरू आहे. या ठिकाणी विविध सण आणि महोत्सव स्थानिक रहिवाशांमार्फत मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या प्रकल्पांतर्गत २५० मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळण्याकरीता व्यवस्था आणि खुली व्यायाम शाळा, कोळी संस्कृती दर्शविणारी शिल्पे, प्रसाधन गृह, ॲम्पी थिएटर, सभा मंडप, विसर्जन घाट चौक, रस्ता आणि पदपथ, जेट्टीकडील रस्ता, उद्यान कामे आणि वृक्ष लागवड, सुरक्षा रक्षक कक्ष, सीसीटीव्ही नेटवर्क आणि विद्युत कामे कामे करण्यात आली आहेत.

प्रकल्पाची होणार दुरुस्ती

कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पातील ॲम्पी थिएटरच्या स्टेजला तडे गेले असून आसनांची मोडतोड आणि तोफांचा चौथरा उखडला असल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. ॲम्पी थिएटरच्या मागील बाजूच्या भिंतीच्या गिलाव्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आले. तसेच, तोफांकरिता एकूण ६ दगडी चौथरे बांधण्यात आले असून त्यापैकी एका चौधऱ्याचे काही दगड निखळले आहेत. त्याचबरोबर, गझिबोतोल काही लाकडी आसन मोडकळीस आली आहेत. या सर्व गोष्टींची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश प्रशासनाने संबंधित कंत्राटदारास दिले आहेत.

काँग्रेसचा आरोप काय होता

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोपरी खाडीलगतच्या “कोपरी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट” प्रकल्पाचा फज्जा उडाला आहे. अवघ्या अडीच वर्षांतच कोट्यवधींचा प्रकल्प मोडकळीस आला असून निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आला आहे, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता राहुल पिंगळे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

कंत्राटदार स्वखर्चाने करणार दुरुस्ती

कोपरी-ठाणे (पूर्व) खाडीलगत विकसित करण्यात आलेल्या कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पात काही ठिकाणी तत्काळ दुरुस्तीची आवश्यकता असून ती कामे कंत्राटदार स्वखर्चाने करणार आहे. तसे निर्देश कंत्राटदारास दिल्याचे ठाणे स्मार्ट सिटीचे सीईओ संदीप माळवी यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकल्पातील कामांचा दोषदायित्व कालावधी जरी संपुष्टात आलेला असला तरीही ही सर्व दुरुस्तीची कामे संबंधित कंत्राटदाराकडून त्याच्याच खर्चाने करून घेण्यात येणार आहेत., असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.