ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा करण्यात येत असतानाच, सोमवारी नवी मुंबईतील शिवसेनेच्या शिबिरात पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघाच्या जागेवर दावा केला. कोणताही उमेदवार द्या पण तो शिवसेनेचाच असावा, असा सूर सर्वच पदाधिकाऱ्यांनी लावत याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरण्याची भूमिका जाहीर केली. यामुळे या जागेचा तिढा कायम असल्याचे चित्र आहे.

नवी मुंबई येथील ऐरोली सेक्टर १५ मधील हेगडे भवन येथे ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी मार्गदर्शन शिबीर सोमवारी सायंकाळी पार पडले. या शिबिरास मंत्री दीपक केसरकर, शिवसेना उपनेते विजय नाहटा, प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांच्यासह नवी मुंबईतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी, अशी सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. पण, ही जागा शिवसेनेला मिळणार की नाही, याबाबत दररोज वेगवेगळ्या बातम्या येत आहे. यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून यातूनच त्यांच्याकडून विचारणा होत होती. याच पार्श्वभूमीवर हे शिबीर तातडीने घेण्यात आले.

हेही वाचा – कल्याणच्या उमेवारीवरून ठाकरे गटात सावळागोंधळ, ट्विटरवरून स्वतःच केली उमेदवारी जाहीर, नंतर ट्विट डिलीट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचेच आहेत. हा जिल्हा शिवसेनेचा आणि स्वर्गीय आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे हा जिल्हा शिवसेनेच्या हतातून सुटला नाही पाहिजे, अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यामुळे जो कोणी उमेदवार असेल, तो धनुष्यबाणावरच लढला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थतीत या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार असायला हवा, असा सूर विजय चौगुले यांनी लावला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरण्याची मागणी त्यांनी पक्ष नेत्यांकडे यावेळी केली. असाच काहीसा सूर माजी आमदार रवींद्र फाटक यांनी लावला. आमदार प्रताप सरनाईक, प्रवक्ते नरेश म्हस्के आणि मी अशा तिघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ठाणे लोकसभा जागा शिवसेनेकडेच असावी, अशी विनंती केली आहे, असे फाटक यांनी सांगितले. मंत्री केसरकर यांनी यावेळी विरोधकांवर टीका करत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या कामाची माहिती दिली.

ठाण्याची जागा शिवसेनेकडे ?

नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे, तेच शंभर टक्के मुख्यमंत्री करतील. आपल्या सर्वांच्या मनाप्रमाणेच होईल. या जिल्ह्यातील कार्यकर्त्याना आनंद दिघे यांचा आशीर्वाद आहे. आपला उमेदवार शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हेच आहेत, असे मानून काम करा आणि आपल्या मनाविरुद्ध काहीच होणार नाही, असे सांगत नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळणार असल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले.

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

अनेकजण इच्छुक असतील पण, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे हे दोनच चेहेरे आपल्या नजरेसमोर ठेवून काम करा. राज्यातून ४५ च्या पेक्षा जास्त जागा निवडून आणणार, असा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. त्यामुळे उमेदवार कोण हे आपल्यासाठी महत्वाचे नसून मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलेला शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे, असे म्हस्के यांनी सांगितले.