ठाणे : ठाण्यातील एमसीएचआय – क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून शहरात भरविण्यात आलेल्या यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनामध्ये ३० लाखांच्या परवडणाऱ्या घरांसह ३ कोटी पर्यंतच्या अलिशान घरांचा पर्याय ठाणेकरांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाणे, घोडबंदर, शिळफाटा, काल्हेर-कशेळी भागातील हे प्रकल्प असून त्याचबरोबर – पुणे, कसारा, शहापूर, इगतपुरी भागातील बंगलो आणि प्लाॅटचेही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रदर्शन काळात घर खरेदी करणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहिण विशेष सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातील एमसीएचआय – क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून गेल्या २२ वर्षांपासून शहरात मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यंदा ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर येथे भरविण्यात आले असून हे प्रदर्शन १० फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांतील घरे विक्रिसाठी ठेवण्यात आली असून यामध्ये शहरातील नामांकित बांधकाम व्यावासायिकांच्या गृहप्रकल्पांचा समावेश आहे. या प्रदर्शनात मध्यमवर्गीयांपासून ते श्रीमंतापर्यंत अशा सर्वांनाच घरे खरेदी करता यावीत, या दृष्टीकोनातून परवडणारी तसेच अलीशान अशा दोन्ही घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये ३१५ चौरस फुटाची छोटी तर, त्याहून मोठ्या आकाराची घरे उपलब्ध आहेत. हि घरे ठाणे, घोडबंदर, शिळफाटा, काल्हेर-कशेळी पट्ट्यातील आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी वातानुकूलीत प्रशस्त मंडप उभारण्यात आलेला असून त्याठिकाणी गृह प्रकल्पातील घरांच्या विक्रीचे स्टाॅल लावण्यात आलेले आहेत. याशिवाय, १५ हून अधिक वित्त संस्थांचेही स्टाॅल लावण्यात आलेले आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांनी एकाच छताखाली ठाणे शहरातील उत्तमोत्तम गृहप्रकल्पात घर घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय, घराची २० टक्के रक्कम देऊन घर खरेदी करणाऱ्या ‘लाडक्या बहीणीला’ विशेष सवलत दिली जात आहे. त्याचबरोबर – पुणे, कसारा, शहापूर, इगतपुरी भागातील बंगलो आणि प्लाॅटचेही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शहरातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित विषयावर लोकसत्ता ने ‘समृद्ध सुसज्ज ठाणे’ अशी पुस्तिका तयार केली असून त्याचे प्रकाशन शुक्रवारी एमसीएचआयने भरविलेल्या मालमत्ता प्रदर्शनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाईड डीसीआर ) च्या माध्यमातून विकासकांनाही फायदा झालेला आहे. त्यामुळे आता विकासकांनाही आता ग्राहकांचा विचार केला पाहिजे. ठाण्यात क्लस्टरचे पाच ठिकाणी वेगाने काम सुरु असून त्यात विविध शासकीय संस्था सहभागी झाल्या आहेत. ठाण्यातील विकासकांनीही या योजनेत सहभागी व्हावे. सरकार हे सर्वसामान्यांसाठी असते. विकासकही सर्वसामान्यांसाठी घरे बांधत असतो. त्यामुळे त्यांच्याही समस्या जाणून घ्यायला हव्यात. माझ्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खाते आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करु नका. परंतु ग्राहकाला चांगला फायदा द्या.

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात ठाणे शहराला ७० ते ८० हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे शहरात भुयारी मार्ग, रस्ते मार्ग, अंतर्गत मेट्रो अशा विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. वाढत्या नागरिकरणामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ती सोडविण्यासाठी एमएमआरडीएमार्फत रस्ते जोडणीची कामे हाती घेण्यात येत आहेत. त्यामुळे कोंडी काही प्रमाणात कमी होईल. शहराचा विकास होत असल्यामुळे ठाणे हे देशाचे माॅडेल शहर ठरेल.

प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

ठाणे शहरातील रस्ते प्रकल्प, उद्यान तसेच विविध प्रकल्पात विकासक योगदान देत आहेत. कल्पतरु विकासकाने सेंट्रल पार्क सारखे उद्यान विकसित केले आहे. शहराच्या विकासात विकासकांचा हातभार लागत आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.

जितेंद्र मेहता, अध्यक्ष, एमसीएचआय

मुंबई शहर हे एक वटवृक्ष होते तर, ठाणे शहर हे एक रोपटे होते. परंतु आता ठाणे शहर बदलत आहे. गेल्या काही वर्षात याठिकाणी मोठमोठे प्रकल्प आले आहेत. आयटी क्षेत्र, उद्योग, बांधकाम क्षेत्र याठिकाणी आहे. येथे पायाभुत प्रकल्पांची उभारणी होत आहे. त्यामुळे येत्या काळात ठाणे हे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करेल. शहरातील पाणी, वाहतूक कोंडी समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सौरभ राव, आयुक्त, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane mchi credai property exhibition houses ranging from 30 lakhs to 3 crores css