ठाणे : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दिनेश घाग या आरोपीला वर्तकनगर पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दिनेश हा ठाण्यातील किसननगर भागातील रहिवाशी आहे.
१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी रविवारी (२९ जून) रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास क्लासवरून घरी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने मोटारीने तिचा पाठलाग केला. या व्यक्तीने तिला गाडीत बसण्याचा इशाराही केला होता. घाबरलेल्या या मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यावर तिच्या आईने तात्काळ वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्या अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जे. चिंतामण आणि तपास पथकाने तत्काळ घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यामध्ये संशयित इसमाच्या लाल रंगाच्या गाडीचा क्रमांक मिळवण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक पद्धतीने तपास पुढे नेल्यावर दिनेश घाग असे आरोपीचे नाव असून तो ठाण्यातील किसननगर भागातील असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तो तेथे अनुपस्थित असल्यामुळे त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याचे लोकेशन मिळवण्यात आले.
लोकेशनप्रमाणे दिनेश हा कल्याणमधील खडकपाडा भागातील एका बारमध्ये असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाड टाकून दिनेश ला अटक केले. त्याच्यावर सबळ पुराव्यांनिशी केवळ २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.