ganesh naik : ठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच, त्यावर आता वनमंत्री गणेश नाईक यांनीही भाष्य केले आहे. बहुतांश अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आणि ते सगळं आता शुद्ध व्हायला लागल आहे, असे नाईक यांनी म्हटले आहे.

ठाण्यातील मोह विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री गणेश नाईक यांनी हे उपस्थित होते. तर, विशेष अतिथी म्हणून आमदार निरंजन डावखरे हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “मी स्वतः या विद्यालयाचा विद्यार्थी राहिलो आहे. त्या काळी एस.व्ही. कुलकर्णी सर प्राचार्य होते. मी येथे अकरावी शिक्षण घेतले आणि नंतर ठाणे कॉलेजला गेलो. त्यामुळे या शाळेशी आपलेपणाची भावना आहे. या शाळेचे कार्य अधिक मोठ्या प्रमाणावर व्हावे, ही धारणा ठेवून मी आज येथे आलो आहे,” असे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

गोर-गरिबांवर होणारा अन्याय दूर करणार

येत्या ६ ऑक्टोबर रोजी गडकरी रंगायतन येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. “ज्या नागरिकांवर अन्याय झाला आहे, ज्यांना शंका-कुशंका आहेत, त्यांनी या दरबारात यावे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार गोर-गरिबांवर होणारा अन्याय दूर करण्यास कटिबद्ध आहे,” असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “या विषयावर माझ्या पक्षाचे प्रवक्ते सक्षम आहेत. त्यामुळे मी यावर भाष्य करणार नाही,” असे नाईक म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाविषयी मी नंतर बोलेन,” असे त्यांनी सांगत याविषयावर बोलणे टाळले.

सगळं आता शुद्ध व्हायला लागला आहे

ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “गेल्या पाच वर्षांत ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांमध्ये सगळ्याच अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला नाही. पण, बहुतांश अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे. ते सगळं आता शुद्ध व्हायला लागला आहे, असे नाईक म्हणाले.