ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे शहरात वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार समोर येत असतानाच, संपुर्ण शहरात ९८ अतिधोकादायक तर, दोनशे धोकादायक वृक्ष असल्याची बाब महापालिकेच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यापैकी ७० अतिधोकादायक तर, १५० धोकादायक वृक्ष हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच रस्त्यांच्या कडेला असलेल्या आणि इतर ठिकाणच्या धोकादायक झाडांच्या फांद्यांच्या छाटणीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडतात. यात विदेशी वृक्ष पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. अशा घटनांमध्ये काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा घटना टाळण्यासाठी ठाणे महापालिकेकडून दरवर्षी शहरातील वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यात अतिधोकादायक आणि धोकादायक वृक्षांची नोंद करण्यात येते. हे वृक्ष उन्मळून पडून जिवीतहानी होऊ नये यासाठी ते हटविण्याची कारवाई करण्यात येते. यंदाही ठाणे महापालिकेने अशाचप्रकारे वृक्षांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात संपुर्ण शहरात ९८ अतिधोकादायक तर, दोनशे धोकादायक वृक्ष असल्याची माहिती समोर आली असून त्यापैकी ७० अतिधोकादायक तर, १५० धोकादायक वृक्ष हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित वृक्ष हटविण्याची कारवाई सुरू आहे. याशिवाय ७८२३ वृक्षांच्या फांद्यापैकी ४ हजारांच्या आसपास फांद्याची छाटणी करण्यात आली आहे. वृक्षांच्या फांद्या तोड़ल्यानंतर त्या तातडीने उचलल्या जाव्यात आणि या कामावर देखरेख रहावी यासाठी वृक्षांच्या फांद्यांची वाहतूक करणाऱ्या डम्परवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>>ठाण्यात वीजेचा धक्का लागून भटक्या श्वानाचा मृत्यु? खांबातून वीजेचा प्रवाह होत नसल्याचा ठाणे महापालिकेचा दावा

आयुक्तांच्या सुचना

शहरातील वृक्षांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी महत्वाची असून ती सातत्याने करत रहावी. वृक्ष प्राधिकरण विभागाने शहरातील किती वृक्षांच्या फांद्या छाटल्या गेल्या, याचा दैनंदिन अहवाल घ्यावा. धोकादायक वृक्षांचा सर्व्हे करण्यात यावा आणि यामुळे जीवीत व वित्तहानी होणार नाही याची काळजी घ्यावी. मान्सून कालावधीत ज्या ठिकाणी वृक्ष पडेल, त्या ठिकाणचा रस्ता विनाविलंब मोकळा करावा. यासाठी अग्निशामक दलाशी समन्वय साधावा. आवश्यक असलेले इलेक्ट्रिक कटर व इतर साहित्य पुरेशा संख्येने उपलब्ध ठेवावे. रस्त्याच्या बाजूला झाडांच्या फांद्या कुजेपर्यत पडून राहणार नाहीत याबाबतही दक्षता घ्यावी. पावसाळ्यामध्ये शहरातील कोणत्याही भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अग्निशामक विभागाने आवश्यक यंत्रणेसह कमीत कमी वेळेत घटनास्थळी कसे पोहचता येईल, यासाठी सर्तक रहावे, असे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठकीत दिले आहेत.

हेही वाचा >>>ठाणे: जाहीरात फलक पडून जिवीतहानी झाल्यास मालकावर गुन्हा दाखल होणार

जास्त पैसे घेतल्यास ठेकेदारावर कारवाई

खासगी गृहसंकुलातील तसेच खासगी जागांवरील धोकादायक वृक्ष किंवा फांद्या छाटणे गरजेचे आहे. या कामामध्ये खाजगी गृहसंकुलधारकांची पिळवणूक होणार नाही हे पाहणे महापालिकेचे कर्तव्य आहे. अशाप्रकारे झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी आपण ठेकेदाराची नियुक्ती केली आहे, या संदर्भात संबंधित विभागाने दर निश्चित करावेत आणि निश्चित केलेल्या दरापेक्षा एकही रुपया ठेकेदार जास्त घेणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच यामध्ये ठेकेदारामार्फत जास्त पैशाची आकारणी होत असल्यास तात्काळ त्याला काळ्या यादीत टाकावे, असे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत.