ठाणे : ठाणे बाजारपेठ ते सॅटीस पूल हा बसगाड्या सॅटीसवर येण्याचा मार्ग आहे. या मार्गावरून वर जाण्याच्या ठिकाणीच टीएमटीची बस गाडी सायंकाळी अचानक बंद पडली. यामुळे इतर ठिकाणाहून आलेल्या बसगाड्या बंद पडलेल्या टीएमटी बस गाडीमागे अडकल्या होत्या. त्यामुळे सॅटिस पुलावर सायंकाळी बराच वेळ एकही बसगाडी उपलब्ध नव्हती. बस गाडी नसल्याने प्रवाशांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

ठाणे शहरात दिवसाला लाखो प्रवासी ये जा करतात. शहरातील विविध भागांमध्ये मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग तसेच खासगी कार्यालये आहेत. शहरांमधून अनेक प्रवासी कामानिमित्त ठाणे शहरात येत असतात. तसेच काही प्रवासी कामानिमित नेहमी शहराबाहेर जात असतात. शहरातील अंतर्गत ठिकाणांवर रिक्षाने जाणे खर्चिक पडते. प्रवाशांना दररोज प्रवास करणे सोपे जावे म्हणुन ठाणे शहराच्या पश्चिम आणि पुर्व दिशेला ठाणे महापालिका परिवहन सेवा बस गाड्यांचा थांबा आहे. दिवसभरात अनेक प्रवासी या बसगाड्यांमधून इच्छित स्थळी जात असतात. शहरातील विविध मार्गांसह मुलुंड, बोरिवली, मिरा-भाईंदर या शहरांमध्ये ठाणे परिवहन विभागाच्या (टीएमटी) बसगाड्या धावतात. या बसगाड्यांमधून दिवसाला हजारो प्रवासी प्रवास करतात.

या प्रवाशांसाठी ठाणे सॅटीसवरुन टीएमटी बसगाड्या सोडल्या जातात. सॅटीसवर बसगाड्या खाली तसेच वर येण्यासाठी असे एकूण तीन मार्ग आहेत. त्यात, दोन मार्ग हे बस खाली उतरण्याचे आहेत. त्यामध्ये ठाणे बाजारपेठ ते सॅटीस पूल हा बसगाड्या सॅटीसवर येण्याचा मार्ग आहे. तर, सॅटीस पूल ते तलावपाळी आणि दुसरा म्हणजे सॅटीसपूल ते बी कॅबिन रस्ता हे दोन मार्ग बस खाली उतरण्याचे आहेत. यामध्ये ठाणे बाजारपेठ ते सॅटीस पूल या मार्गावरून वर जाण्याच्या ठिकाणीच टीएमटीची बस गाडी सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान अचानक बंद पडली. यामुळे इतर ठिकाणाहून ठाणे स्थानकाजवळ आलेल्या बसगाड्या बंद पडलेल्या टीएमटी बस गाडीच्या मागे अडकल्या होत्या. यामुळे सॅटिस पूलावर एकही गाडी बस गाडी उपलब्ध नव्हती. कामावरून घरी परतण्याच्या वेळेमध्येच सर्व टीएमटी बस गाड्या अडकल्या होत्या. यामुळे ठाणे स्थानकाजवळ असलेल्या सॅटिस पूलावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.