ठाणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यात पक्ष प्रवेशाची मालिका सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
ठाण्यातील आनंदाश्रम येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे विक्रम खामकर, प्रफुल्ल कांबळे, पीटर डिसोजा, विलास पाटील, अभिषेक कुसाळकर, सुनील कुराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नव्याने दाखल झालेल्यांचे स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगत, या प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट केले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, माजी नगरसेवक योगेश जानकर आदींसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाड यांना धक्का
विक्रम खामकर, प्रफुल्ल कांबळे, पीटर डिसोजा, विलास पाटील, अभिषेक कुसाळकर, सुनील कुराडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हाती भगवा घेतला. हे सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे कार्यकर्ते होते. या प्रवेशामुळे जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राजकारणाच्या पलीकडे बघण्याची दृष्टी
मी मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे. सत्ता हातात आहे, अधिकार हातात आहेत. मात्र कधीही याचा दुरुपयोग केलेला नाही. आज ज्यांनी पक्षात प्रवेश केला, ते पूर्वी शिवसेनेच्या विरोधात काम करत होते. तरीसुद्धा मी कधीही त्यांच्यावर राग धरला नाही. राजकारणाच्या पलीकडे बघण्याची दृष्टी असावी लागते,” असेही शिंदे यांनी म्हटले.
जो पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करतो, तोच पुढे जातो. आमच्या पक्षात वशिलेबाजीला स्थान नाही. पक्ष वाढला की तुमचा मान-सन्मान आपोआप वाढतो. म्हणून पक्षासाठी झोकून देऊन काम करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच पक्षात वशिलेबाजीला स्थान नाही, असा इशारा त्यांनी दिला.