ठाणे : उदे गं अंबे उदे…अशी साद घालत सोमवारी म्हणजेच २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. यंदा जिल्ह्यात देवीच्या ३ हजार ८६२ मूर्ती आणि ७ हजार ५३२ घटांची प्रतिष्ठापना होणार आहे. तसेच ५९० ठिकाणी सार्वजनिक तर ५०० ठिकाणच्या खासगी क्षेत्रात गरबा, दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे तरूणाईसह सर्वांना उत्सवाची आतुरता लागली आहे.
ठाणे जिल्ह्यात गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सव पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जातो. ठाणे शहरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख नेते आनंद दिघे यांनी टेंभी नाका येथे सुरू केलेल्या जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रौत्सव याचे प्रमुख आकर्षण असते. त्याचबरोबर कल्याणच्या दुर्गाडी मंदिरात देखील नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात होतो. जिल्ह्यात यंदा ३ हजार ८६२ ठिकाणी दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यापैकी ६०८ सार्वजनिक तर ३ हजार २५४ खासगी क्षेत्रात आहेत.
यामध्ये ठाणे परिमंडळात १०८ सार्वजनिक २३१ खासगी क्षेत्रात, भिवंडीत ९६ सार्वजनिक तर १८६ खासगी क्षेत्रात , कल्याणमध्ये सार्वजनिक १३६ तर २ हजार ६२४ खासगी क्षेत्रात, उल्हासनगरात ११८ सार्वजनिक तर ८९ खासगी क्षेत्रात, वागळे इस्टेट येथे १५० सार्वजनिक आणि १२४ खासगी क्षेत्रात मूर्तीचा समावेश आहे. देवीच्या मूर्तीसोबत घटाची स्थापना करण्याची प्रथा आहे. घट बसवणाऱ्या भक्तांची संख्याही अधिक आहे. यंदा ७ हजार ५३२ घटांची स्थापना होणार आहे. यामध्ये ४६ सार्वजनिक आणि ७ हजार ४८६ खासगी क्षेत्रात घटांचा समावेश आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी देवीची प्रतिमा ठेवून पूजन केले जाते. त्याभोवती फेर धरत गरबा खेळला जातो. अशा १३३ सार्वजनिक, तर २८७ खासगी क्षेत्रात ठिकाणी देवीच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. तरुणाई नऊ दिवस दांडिया- रासगरब्यात ठेका धरून नृत्य करतात. यावर्षी रासगरब्याचे ५९० सार्वजनिक तर ५०० खासगी क्षेत्रात आयोजन करण्यात आले आहे.
रामलीला, रावणदहन
नवरात्रीत दुर्गादेवीच्या जागरासह रामाचीही उपासना केली जाते. त्यानंतर दहाव्या दिवशी रावणदहन करण्याची प्रथा आहे. त्यानुसार भिवंडी, उल्हासनगर, वागळे इस्टेट या तीन ठिकाणी रामलीलाचे आयोजन करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील १२ ठिकाणी रावणदहन होणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
नवरात्रोत्सवात ५५ मंदिरांमध्येही उत्सव साजरा होणार आहे. पंचमी, अष्टमीला या मंदिरांमध्ये ओटी भरण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. याशिवाय ११७ ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजनाचे आयोजन करण्यात आले आहे.