ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठाणे शहराचा पाहणी दौरा करत असताना सिध्देश्वर तलावाची अवस्था पाहून असं जाणवलं की, ‘तलावांचे शहर नाव बदलून कचऱ्याचे व डबक्याचे शहर नाव ठेवलं पाहिजे.’, अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे.

माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची बुधवारी भेट घेतली. या बैठकीत ठाणे शहरातील तलावांची झालेली दुरावस्थेसह शहरातील अपूर्ण असलेल्या कामांबाबत विचारे यांनी विचारणा केली होती. त्यापाठोपाठ विचारे यांनी शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठाणे शहराचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, भगवान शिंदे, वैभव तपकिरी, चंद्रकांत सावंत, स्वच्छता निरीक्षक अधिकारी व इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दौऱ्यात ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठाणे शहराचा पाहणी दौरा करत असताना सिद्धेश्वर तलावाची अवस्था पाहून असं जाणवलं की, ‘तलावांचे शहर नाव बदलून कचऱ्याचे व डबक्याचे शहर नाव ठेवलं पाहिजे.’, अशी प्रतिक्रिया विचारे यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे.

बैठकीतही विचारला होता जाब

गेल्या सहा महिन्यापासून ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची झालेल्या दुरवस्थेबाबत वारंवार पत्र देऊन गाळ काढण्याची मागणी करत आहे. याचा नियोजित आराखडा ही मंजूर करून निधी अभावी काम थांबवून याकडे गांभीर्याने दुर्लक्ष करून आवडत्या ठेकेदारांची देयके काढण्यात अधिकारी व्यस्त आहेत. या त्यांच्या निष्काळजीपणामुळे तलावातील वारंवार मासे मरत आहे, असा आरोप विचारे यांनी आयुक्त राव यांच्या भेटीदरम्यान केला होता. त्यापाठोपाठ आता तलावांच्या मुद्द्यावरून विचारे यांनी पालिका प्रशासनावर पुन्हा टीका केली आहे.

अन्यथा आंदोलन करू

लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे सिध्देश्वर तलाव परिसरातील रूपादेवी पाडा येथील नाल्यात कचरा साठला आहे, हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तलावाची, नाल्यांची स्वच्छता वेळेत पूर्ण करावीत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा विचारे यांनी दिला आहे.