ठाणे :ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई-एमसीएचआय ठाणे या संस्थेेने भरविण्यात आलेल्या मालमत्ता प्रदर्शनामध्ये परवडणारी, मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय अशा सर्वांचा विचार करून ४० लाखांपासून ते ४ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांबरोबरच व्यावसायिक वापरासाठी कार्यालयांचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवाय, मुंबई, बदलापूर, नेरळ, बदलापूर भागातील घरे आणि नवी मुंबई विमानतळ परिसरात बंगलो प्लाॅटचे पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रदर्शनात ठाणे महापालिकेच्या स्टाॅलवर व्ही.आर कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहराची आभासी पद्धतीने हेलिकाॅप्टर सैर केली जात असून हा स्टाॅल प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे येथील पोखरण रोड क्रमांक १ वरील रेमंड कंपनीच्या मैदानात क्रेडाई-एमसीएचआय ठाणे या संस्थेने मालमत्ता प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यानंतर हे प्रदर्शन ग्राहकांसाठी खुले करण्यात आले. १९ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० यावेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात ठाणे शहरातील शंभरहून अधिक गृहप्रकल्पातील घरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. या प्रदर्शनात ५० हून अधिक बांधकाम व्यावसायिक आणि १५ हून अधिक बँका व गृहकर्ज वित्तीय संस्था सहभागी झाल्या असून बँका व गृहकर्ज वित्तीय संस्थांनी प्रदर्शनात स्टाॅल लावले आहेत. प्रदर्शनात नागरिकांना विनामुल्य प्रवेश दिला जात आहे.

हेही वाचा : महेश गायकवाड यांच्या स्वागताचे कल्याणमध्ये फलक, फलकांवर भावी आमदार, टायगर म्हणून उल्लेख

यंदाच्या मालमत्ता मालमत्ता प्रदर्शनामध्ये परवडणारी, मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय अशा सर्वांचा विचार करून घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ठाणे, घोडबंदर भागात ३०० चौरस फुटापासून ते त्याहून अधिक चौरसफुटाच्या घरांचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेले असून या घरांच्या किंमती ४० लाखांपासून ते ४ कोटी रुपयांपर्यंत आहेत. याशिवाय, वागळे इस्टेट परिसरात आयटी कंपन्यांची कार्यालये उभी राहिली असून या परिसरात व्यावसायिक वापरासाठी कार्यालयांचे पर्याय ग्राहकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कार्यालयांच्या किंंमती ९० लाखांपासून पुढे आहेत. मुंबईतील सायन-चुनाभट्टी भागात २०० चौरसफुटापासून ते त्यापुढील चौरसफुटांच्या घरे प्रदर्शनात विक्रिसाठी असून त्याची किंमत ४५ लाखापासून ते ७५ लाखांपर्यंत आहे. तसेच बदलापूर, नेरळ भागातील घरे आणि दुकान असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले असून बदलापूरमधील घरांच्या किंमती १३ लाख ते २८ लाखांपर्यंत आहेत. तर, बदलापूरमध्ये बंगलो प्लाॅटची किंमत ६२५ रुपये प्रति चौरसफुट इतकी आहे. नेरळ भागातील दुकानांच्या किंमती २५ लाख रुपये इतकी आहे. नवी मुंबई विमानतळ परिसरात बंगलो प्लाॅटचे पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हेही वाचा : कल्याणमधील ॲक्सिस बँकेची घरखरेदी-विक्रीत चार कोटींची फसवणूक

हेलिकाॅप्टर सैर

मालमत्ता प्रदर्शनात ठाणे महापालिकेचा स्टाॅल लावण्यात आलेला असून याठिकाणी ठाणे शहरातील विविध पयाभुत प्रकल्पांची माहिती देण्यात आलेली आहे. याच स्टाॅलवर व्ही.आर कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहराची आभासी पद्धतीने हेलिकाॅप्टर सैर करण्यात येत आहे. ठाण्याचा मासुंदा तलाव, उपवन तलाव, सिद्धेश्वर तलाव, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, घोडबंदर, तीन हात नाका, पोखरण रस्ता क्रमांक १, माजिवाडा, घोडबंदर आणि गायमुख आणि वसई खाडी हा परिसर हेलिकाॅप्टर सैरमध्ये पहाव्यास मिळतो. यंदाच्या प्रदर्शनातील ही वेगळी संकल्पना असून हा स्टाॅल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच आभासी पद्धतीने हेलिकाॅप्टर सैर कशी असेल या उत्स्कूतेपोटी येथे गर्दी होताना दिसून येते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane property exhibition virtual helicopter ride home options from 40 lacs to 4 crores in thane css