कल्याण – मागील दोन दिवसांपासून कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी समाज माध्यमांमध्ये प्रसारित केली आहे. त्यामुळे महेश यांच्या समर्थकांनी कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्या स्वागताचे फलक जागोजागी लावले आहेत.
गेल्या १५ दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात शहरप्रमुख महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. महेश यांची प्रकृती आता सुस्थितीत झाल्याने त्यांना डाॅक्टर दोन दिवसात सोडतील, अशी माहिती त्यांच्या समर्थकांनी प्रसारित केली आहे. कल्याण पूर्व भागात महेश समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांची उल्हासनगर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. आमदार गायकवाड आता तळोजा कारागृहात आहेत.
हेही वाचा – कल्याणमधील ॲक्सिस बँकेची घरखरेदी-विक्रीत चार कोटींची फसवणूक
महेश गायकवाड यांच्या फलकावर ‘गरीबांचा कैवारी’. ’वाघ अजून जिवंत आहे’, भावी आमदार, अशी विशेषणे लावण्यात आली आहेत. कार्यकर्त्याचा उत्साह दांडगा असला तरी शिवसेना, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना या विषयावर कोणत्याही प्रकारचे भाष्य न करण्याच्या सूचना केल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या आततायी कृतीमुळे असे प्रकार घडत असल्याचे नेत्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणमध्ये विकास प्रकल्प उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी कार्यक्रम ठिकाणी शिवसेना, भाजपचा एकही पदाधिकारी, कार्यकर्ता फिरकला नव्हता. महेश गायकवाड पूर्ण तंदुरुस्त झाल्याशिवाय त्यांना न सोडण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.